सोलापूर महापालिका अंदाजपत्रकीय सभेवर गटबाजीचे सावट

सोलापूर महापालिका अंदाजपत्रकीय सभेवर गटबाजीचे सावट

सोलापूर  ः महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेवर भाजपमधील गटबाजीचे सावट असून, सभा पुढे ढकलली जाण्याचे संकेत मिळत आहेत. अंदाजपत्रकाचा अभ्यास करायला पुरेसा वेळ मिळाला नाही हे कारण सांगितले जात असले तरी, भांडवली निधीची खात्री न मिळाल्याने बजेट सभेलाच न जाण्याची भूमिका नगरसेवकांकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.

भाजपचे नूतन शहराध्यक्ष विक्रम देशमुख काल महापालिकेत आले होते. महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशीकला बत्तुल, सभागृह नेते संजय कोळी यांनी त्यांचे स्वागत केले. नगरसेवकांना अंदाजपत्रकाची माहिती होण्यासाठी अवधी मिळाला पाहिजे. त्यासाठी अंदाजपत्रकीय सभा पुढे ढकलता आली तर पहावी, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, सायंकाळी श्री. कोळी व बत्तुल यांनी महापौर बनशेट्टी यांची भेट घेऊन सभा पुढे ढकलण्याची विनंती केली. विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनीही सभा पुढे ढकलावी, ते शक्य नसल्यास परिवहन (ब) आणि पाणीपुरवठा (क) हे अंदाजपत्रक मंजूर करून घ्यावे आणि महापालिकेच्या (अ) अंदाजपत्रकासाठी पु्न्हा सभा घ्यावी, असे सुचवले आहे. त्यामुळे अंदाजपत्रकीय सभा होते की नाही हे गुरुवारी (ता. २७) सकाळीच स्पष्ट होणार आहे.

महापालिकेतील सभागृहनेता कार्यालय आणि शासकीय विश्रामधाम या दोन्ही ठिकाणी झालेल्या चर्चेदरम्यान, भांडवली निधी न देण्यावर आयुक्त ठाम होते. त्यामुळे बजेटच मिळणार नसेल तर सभा कशाला घ्यायची आणि चर्चा तरी कशाला करायची अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली आहे. दरम्यान, शिवसेना आणि कांग्रेसच्या नगरसेवकांच्याही  अंदाजपत्रकीय सभेबाबत बैठका सुरु झाल्या आहेत. सत्ताधारी भाजपच्या तुलनेत विरोधी पक्ष शिवसेनेची उपसूचना वरचढ होते की काय, अशी चर्चा आहे. भाजपमधील गटबाजी कायम राहिल्यास सर्व विरोधक एकत्रित येऊन शिवसेनेची उपसूचना कदाचित मंजूर करू शकतात अशी स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com