
सोलापूर ः महापौर उमेदवारीवरून भाजपमध्ये तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे इच्छुक दोन महिलांना प्रत्येकी एक वर्ष संधी देण्याचा निर्णय भाजपच्या श्रेष्ठींनी घेतला आहे. उपमहापौरपदासाठीही हाच पॅटर्न वापरला जाणार आहे. आता पहिली संधी कुणाला द्यायची यावरून तिढा निर्माण झाला असून, तो शनिवारी सकाळी सुटेल असा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. नागरीकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव झाले आहे.
श्रीकांचना यन्नम व अंबिका पाटील यांना संधी
महापौरपदासाठी भाजपतर्फे श्रीकांचना यन्नम आणि अंबिका पाटील यांना प्रत्येकी एक वर्ष संधी देण्याचा निर्णय भाजप श्रेष्ठींच्या बैठकीत झाला. तर उपमहापौरपदासाठी मनीषा हुच्चे, राजेश काळे आणि राजेश्री बिराजदार-पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाणार आहे. या दोन्ही पदांसाठी पहिली संधी कुणाला द्यायची, यावर एकमत न झाल्याने तिढा कायम राहिला आहे. महाविकास आघाडीमध्येही हीच स्थिती असल्याने सर्व इच्छुक दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
हेही वाचा : उद्याच होणार 'ठाकरे' सरकारची अग्निपरिक्षा...
निरीक्षक देशपांडेय यांच्या उपस्थितीत बैठक
भाजपचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. शहराध्यक्ष विक्रम देशमुख, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, सभागृह नेते श्रीनिवास करली यांची उमेदवार निश्चितीबाबत बैठक झाली. महापौरपदासाठी श्रीकांचना यन्नम आणि अंबिका पाटील यांच्यासह मनीषा हुच्चे याही इच्छुक होत्या. मात्र चर्चेनंतर हुच्चे यांचे नाव मागे पडले. त्यानंतर यन्नम आणि पाटील यांच्या नावांबाबत चर्चा सुरू झाली. गतवर्षी अन्याय झाल्याने यन्नम यांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन जणांना संधी देण्याचा निर्णय झाला. पहिली संधी कुणाला, हे अद्याप ठरलेले नाही. त्याचा निर्णय उद्या (शनिवारी) सकाळी होईल, असे सांगण्यात आले. उपमहापौरपदासाठी हुच्चे यांचे नाव आघाडीवर असून राजेश काळे आणि राजेश्री पाटील-बिराजदार यांनीही दावा केला आहे. उपमहापौरपादसाठीही उद्या सकाळीच नाव निश्चित होईल, अशी माहिती बैठकीत सहभागी पदाधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा : शिवसेनेचा प्रवास : १९९५ ते २०७९
महाविकास आघाडीकडूनही दोनजण अर्ज भरणार
महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे ठरले. त्यानुसार कॉंग्रेसतर्फे फिरदोस पटेल आणि शिवसेनेतर्फे सारिका पिसे अर्ज दाखल करतील. उपमहापौरपदासाठीही अर्ज दाखल केले जाणार आहेत. मात्र, अंतिम अर्ज कोणाचा ठेवायचा, हे नंतर निश्चित केले जाणार आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. या बैठकीला प्रकाश वाले, हरी चौगुले, भारत जाधव, महेश कोठे, चेतन नरोटे, किसन जाधव, तस्लीम शेख, वहिदाबी शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचा उमेदवार कोण असेल, त्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार अंतिम केला जाईल, असे सांगण्यात आले.
भाजपचे नगरसेवक "अज्ञात'स्थळी
महापौरपदाचा अर्ज उद्या (शनिवारी) दाखल केल्यानंतर भाजपचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना होणार आहेत. हे सर्व नगरसेवक निवडणुकीच्या दिवशी म्हणजे चार डिसेंबर रोजी सोलापुरात परत येतील. दरम्यानच्या कालावधीत एकही नगरसेवक फुटणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी भाजपच्या श्रेष्ठींनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना दिली आहे.