नगरसेवकांच्या प्रश्‍नांनी प्रशासनाला फुटला घाम

विजयकुमार सोनवणे 
रविवार, 8 एप्रिल 2018

महापालिकेच्या अनियंत्रित कारभाराची माहिती खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवार, धनंजय मुंडे व सुनील तटकरे यांना पुराव्यासह दिली आहे. खासदार संसदेत, तर आमदार विधिमंडळात याबाबत लक्षवेधी उपस्थित करणार आहेत. 
- किसन जाधव, गटनेता, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

सोलापूर : भुयारी गटार योजनेचा मक्ता देण्याच्या प्रस्तावावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या अभ्यासपूर्ण प्रश्‍नांमुळे प्रशासनाला अक्षरशः घाम फुटला. दरम्यान, नेत्याचा निरोप आल्यानंतर कॉंग्रेसने आपल्या भूमिकेत अचानक बदल केला आणि निर्णय लांबणीवर पडण्याची स्थिती निर्माण झालेल्या मक्‍त्याच्या विषयाला अनपेक्षित मंजुरी मिळाली. 

सभेच्या सुरवातीलाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किसन जाधव यांनी यासंदर्भात प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. मक्ता मंजूर करण्यापूर्वी शासकीय आदेश आणि अधिनियमातील तरतुदींचे पालन झाले नाही याचे पुरावे दिले. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना त्याचे वारंवार स्पष्टीकरण करावे लागले. हा विषय बेकायदेशीर पाठविण्यात आला आहे, या भूमिकेवर ते एकटेच शेवटपर्यंत ठाम राहिले. 

विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी, मक्‍तेदार नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे का पाठविण्यात आला नाही, असा प्रश्‍न केला. सभापती असो वा नसो कायद्यातील तरतुदीनुसार स्थायी समितीची बैठक आठवड्याला घेणे बंधनकारक आहे. न्यायालयाने सभापती निवड प्रक्रियेला स्थगिती दिली आहे, समितीची बैठक बोलवायला नाही. तीन दिवसींत निर्णय घ्या, अथवा प्रकल्प रद्द करू, अशी धमकी देणारे पत्र शासनाकडून आलेच कसे? असेही ते म्हणाले. 

स्थायी समिती अस्तित्वात असताना ही सभा बोलावली नाही. त्यामुळे नगर सचिवांवर कारवाई करावी. सदस्यांचे अधिकार डावलले जात आहेत, अशी टीका बसपचे आनंद चंदनशिवे यांनी केली. शासनाच्या सर्व योजनांना पाठिंबा असेल, मात्र त्याची प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने व्हावी असे ते म्हणाले. 

महापालिकेला पत्र पाठविणारे नगरविकास विभागाचे उपसचिव जाधव हे कोण आहेत? त्यांना नोटीस पाठविण्याचा अधिकार कोण दिला? कोणतेही शासन तीन दिवसांत निर्णय घ्या, असे सांगूच शकत नाही. अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रशासनाकडे पडून होता, तेंव्हा घाई झाली नाही, आताच का झाली, असा प्रश्‍न श्री. नरोटे यांनी उपस्थित केला. विरोधकांनी मांडलेल्या प्रश्‍नांना भाजपच्याही काही नगरसेवकांनी समर्थन दिले. सभागृहातील स्थिती पाहता आता मतदान होणार आणि विषय बहुमताने फेटाळला जाणार असे चित्र निर्माण झाले. त्यासाठी कॉंग्रेसच्या सदस्यांनी बाहेर जाऊ नये, अशी सूचनाही नरोटे यांनी केली. मात्र काही क्षणातच चित्र बदलले. सभागृहाबाहेर गेलेले नरोटे, विषयाला मंजुरी देण्याची आमची भूमिका आहे, असे सांगतच परतले. कॉंग्रेसने भूमिकेत बदल केल्याचे समजल्यानंतर इतर विरोधकांनीही गप्प राहणे योग्य समजले. फक्त राष्ट्रवादीचे श्री. जाधव आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहिले. 

महापौरांनी शिंदेंचे आभार मानलेच नाहीत 
भुयारी गटारीचा मक्ता मंजूर करण्यासाठी सहकार्य केल्याने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचे महापौर शोभा बनशेट्टी विशेष आभार मानणार आहेत, असा निरोप श्री. नरोटे यांनी दिला. मात्र, महापौरांनी या दोघांचे थेट आभार न मानता, "सहकार्य केलेल्या सर्वपक्षीय नेत्यांचे आभार' म्हणत बोळवण केली. 

महापालिकेच्या अनियंत्रित कारभाराची माहिती खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अजित पवार, धनंजय मुंडे व सुनील तटकरे यांना पुराव्यासह दिली आहे. खासदार संसदेत, तर आमदार विधिमंडळात याबाबत लक्षवेधी उपस्थित करणार आहेत. 
- किसन जाधव, गटनेता, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Web Title: Solapur Municipal Corporation corporater issues