सोलापूर महापालिकेनेच केले 'इंद्रभुवन'चे विद्रुपीकरण

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 11 एप्रिल 2018

इंद्रभुवनचे विद्रुपीकरण करणे चुकीचेच आहे. महापालिकेतील नगरसेवक व अधिकाऱ्यांसाठी शुद्ध पाणीपुरवठ्याची यंत्रणा बसवणे म्हणजे शहरातील लोकांना दूषित पाणीपुरवठा होतो हे खुद्द प्रशासनानेच दाखवून दिले आहे. 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक, शिवसेना 

सोलापूर : शहराचे वैभव असलेल्या व हेरीटेज वास्तू असलेल्या १०० वर्षे होऊन गेलेल्या अप्रतिम इंद्रभुवन इमारतीवर आर ओ प्लॅन्ट उभारुन  महापालिका प्रशासनानेच विद्रुपीकरण केले आहे. अगदी काही अंतरावर असलेल्या प्रशासकीय इमारतीवर हा प्लान्ट बसविता आला असता. पण 100 वर्षे जुन्या असलेल्या इमारतीवर हा प्लान्ट बसविण्याचा प्रशासनाचा हेतू स्पष्ट झालेला नाही. 

पुण्यश्‍लोक अप्पासाहेब वारद यांनी उभारलेल्या या इमारतीवर हा प्लान्ट उभारण्यात आला आहे. मध्यंतरी नगरसेवकांना अळ्यायुक्त पाणी मिळाले होते. त्यामुळे नगरसेवकांनी जोरदार आंदोलन केले. त्या वेळी पहिल्या टप्यात कौन्सिल हॉलवर हा प्लान्ट बसविण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात इंद्रभुवन इमारतीवर बसविण्यात आला आहे. त्यासाठी पत्र्याचे शेडही उभारण्यात आले आहे. 

स्मार्ट सिटीमध्ये विद्रुपीकरण केल्यास गुन्हा नोंदविला जाईल, असे प्रसिद्धीकरण महापालिकेने काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र, शहरात फेरफटका मारला तर सर्वत्र भिंती रंगलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने दिलेल्या इशाऱ्याला प्रतिसाद मिळालेला नाही. आता खुद्द प्रशासनानेच हेरिटेज वास्तूप्रमाणे असलेल्या इमारतीला खिळे ठोकून, पत्र्याचा शेड उभारून विद्रुपीकरण केले आहे. या प्रकरणात कोणावर गुन्हा दाखल केला जाणार, हा खरा प्रश्‍न आहे. दुर्दैव म्हणजे इतके सारे होऊनही पदाधिकारीही गप्पच आहेत. 

इंद्रभुवनचे विद्रुपीकरण करणे चुकीचेच आहे. महापालिकेतील नगरसेवक व अधिकाऱ्यांसाठी शुद्ध पाणीपुरवठ्याची यंत्रणा बसवणे म्हणजे शहरातील लोकांना दूषित पाणीपुरवठा होतो हे खुद्द प्रशासनानेच दाखवून दिले आहे. 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक, शिवसेना 

Web Title: Solapur Municipal Corporation encrochment