सोलापूर महापालिकेतील अधिकाऱ्याने मागितले एक कोटी रुपये 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 29 मे 2018

एकदम एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे पत्र आल्याने त्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर निश्‍चित कारवाई होईल, प्रसंगी घरचा रस्ताही दाखविला जाईल. 
- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त 

सोलापूर - महापालिकेतील एका अधिकाऱ्याने तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे पत्र आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे आले आहे. खुद्द डॉ. ढाकणे यांनीच हा मुद्दा खातेप्रमुखांच्या बैठकीत उपस्थित केला. 

एका प्रकरणात एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे निनावी पत्र आल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगतानाच डॉ. ढाकणे यांनी, महापालिकेतील कोणता अधिकारी काय करतो, त्यांचे काय सुरू आहे, कोणाला भेटतो, कुणाकडे काय मागतो याची इत्थंभूत माहिती मिळत असल्याचे बैठकीत स्पष्ट केले. एक कोटी रुपयांची मागणी करणारा अधिकारी कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले. 

महापालिकेतील अपवाद वगळता बहुतांश अधिकारी पैसे घेतात, हे उघड गुपित आहे, अशी नेहमीच चर्चा असते. काही महिन्यांपूर्वी एका महिला अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख करून, तिने लाखो रुपयांची माया जमवल्याचे निनावी पत्र 107 नगरसेवकांसह काही प्रमुख अधिकाऱ्यांनाही देण्यात आले होते. मात्र ते पत्र निनावी असल्याने त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. अधिकाऱ्यांमधील ईर्षा आणि स्पर्धेतून हे पत्र पाठविण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त करून या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, आता उघडकीस आलेल्या प्रकरणामध्ये खुद्द आयुक्तांनीच ही माहिती उघड केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. पत्रानुसार अंदाज बांधण्यास आयुक्तांनी सुरवात केली असून, लवकरच संबंधित अधिकारी कोण, हे स्पष्ट होईल किंवा आरोप तरी खोटा ठरेल, अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. 

एकाची वेतनवाढ रोखली, दोघांना नोटिसा 
कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल वरिष्ठश्रेणी लिपिक सुनील शेंडगे यांची एक वार्षिक वेतनवाढ रोखण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. तर, दोन जबाबदार अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने त्यांना लवकरच नोटिसा बजावण्याचे संकेतही दिले आहेत. 

एकदम एक कोटी रुपयांची मागणी केल्याचे पत्र आल्याने त्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर निश्‍चित कारवाई होईल, प्रसंगी घरचा रस्ताही दाखविला जाईल. 
- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त 

Web Title: Solapur Municipal Corporation officer demanded 1 crore

टॅग्स