सोलापूरच्या प्रस्तावाना शासन म्हणतंय 'ठेवा रे बाजूला...' 

Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation

सोलापूर : सोलापूर महापालिकेचा विषय आला की, राज्य शासनाने "ठेवा रे बाजूला...'अशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचे विषय वर्ष दोन वर्षापासून शासनाकडे प्रलंबित राहिले असून, ते मंत्रालयातील लाल फितीत अडकले आहेत. त्यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या "लाव रे तो व्हिडीओ' आणि 'आण रे त्याला स्टेजवर' ची खूप चर्चा आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही "आता बघाच तो व्हिडीओ' दाखविण्यास सुरवात केली आहे. त्याच धर्तीवर वर्षानुवर्षे राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विषयांची यादी पाहिली की, राज्य शासनाने सोलापूरचा प्रस्ताव आला की, "ठेवा रे बाजूला...' अशी भूमिका घेतली आहे का, अशी साशंकता येऊ लागली आहे. विशेष म्हणजे महापालिका, राज्य आणि केंद्र शासनात भाजपचीच सत्ता असतानाही महापालिकेशी संबंधित विषयांना वेळेत मंजुरी आणण्यात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाही. 

महापालिकेत सत्तांतर होऊन दोन वर्षे उलटली. या कालावधीत शहराचा विकास होणे अपेक्षित होते. मात्र तसे काही झाले नाही. महापालिकेचे कोणतेही विषय असले तर ते फक्त महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करायचा. त्यांच्या पाठपुराव्याला स्थानिक मंत्र्यांचा पाठिंबा मिळाला असता तर निश्‍चितच अनेक प्रश्‍न वेळेत मार्गी लागले असते. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत झोन समित्या स्थापन होणे आवश्‍यक होते, मात्र महापौर व महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना वारंवार पाठपुरावा केल्यानंतर शासनाने  दीड वर्षांनी त्यास मंजुरी दिली, मात्र महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव स्वतःकडेच ठेवून घेतल्याने झोन समित्या अद्यापही कार्यान्वित झालेल्या नाहीत. त्यामुळे शासन सोलापूरच्या प्रस्तावाबाबत "आणा रे तो प्रस्ताव इकडे...' अशी भूमिका कधी घेणार याबाबत उत्सुकता लागली आहे. 

हे आहेत प्रलंबित प्रस्ताव 
- एलबीटीचे रखडलेले कोट्यवधी रुपयांचे अनुदान 
- जीएसटी अनुदानातील कोट्यवधी रुपयांच्या फरकाची रक्कम 
- महापालिका कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध 
- गाळ्यांच्या लिलावाबाबतचे धोरण निश्‍चित करणे 

महापालिकेच्या विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. सध्याही करत आहे आणि पदावर असेपर्यंतही करणार आहे. शहर विकासासाठी आवश्‍यक असलेले सर्व प्रस्ताव लवकर मंजूर होतील यासाठी आचारसंहिता संपल्यावर मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन भेट घेणार आहे. 
- शोभा बनशेट्टी, महापौर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com