प्लास्टिक मुक्तीसाठी सोलापूर महापालिका प्रशासन सज्ज 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 19 जून 2018

सोलापूर : शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासन प्लास्टिक मुक्तीसाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी अठराजणांचे पथक तयार करण्यात आले असून, एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे घालण्यात येणार आहेत. 

सोलापूर : शासनाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासन प्लास्टिक मुक्तीसाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी अठराजणांचे पथक तयार करण्यात आले असून, एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे घालण्यात येणार आहेत. 

प्लास्टिक पिशव्या तसेच थर्माकोलचे साहित्य वापरणाऱ्यांनी कोणत्याही स्थितीत 22 जूनपर्यंत ते नष्ट करावेत. 23 तारखेला प्लास्टिक किंवा थर्माकोल आढळल्यास जागेवर पाच हजार रुपये दंड आणि प्लास्टिक, थर्माकोल जप्तीची कारवाई केली जाणार आहे. प्लास्टिक व थर्माकोलपासून तयार करण्यात आलेले डिस्पोजल वस्तू, जशा ताट, कप, प्लेट, ग्लास, वाटी, चमचे, भांडे, हॉटेलमध्ये अन्न पॅकिंग करण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, स्ट्रॉचे राज्यात वाहतूक आणि वितरण करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्लास्टिक व थर्माकोलचा वापर सजावटीस करण्यास बंदी आहे. याचा वापर करणाऱ्या व्यक्तीस जागेवर पाच हजार रुपये दंड केला जणार आहे. 

राज्यातील कोणतीही व्यक्ती, व्यकीचा समूह, शासकीय व अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुल, चित्रपट व नाट्यगृह, औद्योगिक घटक, समारंभाचे हॉल, वाणिज्यिक संस्था, कार्यालये, धार्मिक स्थळे, धार्मिक संस्था, हॉटेल, धाबे, दुकानदार, मॉल्स, विक्रेता, केटररर्स, घाऊक व किरकोळे विक्रेता, व्यापारी, फेरीवाला, वितरक, वाहतूकदार, सेल्समन, मंडई, उत्पादक, स्टॉल्स पर्यटन क्षेत्रे, बस व रेल्वे स्थानक या परिसरात ही उत्पादने वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेने दिलेल्या मुदतीनंतर एखादी व्यक्ती किंवा संस्था प्लास्टिकचा वापर करत असेल तर, त्या व्यक्ती किंवा समूहास दंड होईल. तसेच त्यांच्यावर कारावाईही होईल, असे सांगण्यात आले. 

पथकात यांचा आहे समावेश 
आयुक्त (अध्यक्ष), प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी (उपाध्यक्ष), उपायुक्त (सचिव), अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, औषध निरीक्षक, आरोग्याधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विभागीय अधिकारी, अतिक्रमण विरोधी अधिकारी, अन्न व परवाना विभागाचे अधीक्षक, मंडई अधीक्षक, पोलिस निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक, परवाना निरीक्षक, आरोग्य निरीक्षक (सर्व सदस्य) 

Web Title: solapur municipal corporation ready to keep plastic free solapur