सोलापूर महापालिका शाळांतील पट वाढला 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 21 जून 2018

सोलापूर : विद्यार्थी व पुरेशा  पटसंख्येअभावी खासगी शाळांवर गंडांतर येत असताना शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नामुळे महापालिकेच्या शाळांचा पट गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 750 ने वाढला आहे. सरकारी शाळेत मिळणाऱ्या सुविधांची माहिती देऊन पालकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. 

सोलापूर : विद्यार्थी व पुरेशा  पटसंख्येअभावी खासगी शाळांवर गंडांतर येत असताना शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नामुळे महापालिकेच्या शाळांचा पट गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 750 ने वाढला आहे. सरकारी शाळेत मिळणाऱ्या सुविधांची माहिती देऊन पालकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. 

महापालिकेची शाळा म्हटले की बहुतांश पालकांच्या कपाळावर आठ्या पडतात. मात्र, हे चित्र बदलण्यासाठी पालिकेतील शिक्षकांनी प्रयत्न केल्याचे फळ त्यांना मिळाले. विद्यार्थी मिळवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले असून यंदा पालिका शाळांचा पट 750 ने वाढला आहे. 2017-18 या वर्षांत महापालिका शाळांचा पट 4726 होता. तो आता 2018-19 मध्ये 5476 झाला आहे. चालू वर्षासाठी 1549 विद्यार्थ्यांचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यापैकी 1253 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आणखीन पट वाढविण्यासाठी सर्वच माध्यमातील शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांचा किमान पट गतवर्षीच्या तुलनेत एक हजारने वाढेल या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. 

महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या 31, उर्दू माध्यमाच्या 22, कन्नड माध्यमाच्या तीन तर तेलगू माध्यमाच्या दोन अशा एकूण 59 शाळा आहेत. त्यासाठी 196 शिक्षक कार्यरत आहेत. 79 बालवाड्या असून 76 शिक्षिका कार्यरत आहेत. या शिवाय 72 सेविका आहेत. हा सारा डामडौल असतानाही महापालिका शाळेतील पटसंख्या वाढत नव्हती. मात्र यंदा शिक्षकांनी प्रयत्न केले, शाळेत असलेल्या सुविधांची माहिती दिली, काही शिक्षकांनी सुटीच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण दिले, त्यामुळे पालिका शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि पटसंख्या वाढल्याचे दिसून आले. 

महापालिका शाळांत मिळणारी सुविधांची माहिती शिक्षकांनी पालकांना दिली. आता विज्ञान केंद्रांची उभारणीही झाल्याने त्याचेही आकर्षण झाले आहे. खासगी शाळांत ज्यासाठी पैसे मोजावे लागतात, ते सर्व महापालिका शाळेत मोफत मिळते हे बिंबवण्यास आमचे शिक्षक यशस्वी ठरले आहेत. 
- सुधा साळुंके, प्रशासनाधिकारी 
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ 

Web Title: solapur municipal corporation school increased number of students