बदल्या व्हाव्यात; मात्र ‘लक्ष्मीदर्शन’चा अनुभव नको

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

सोलापूर - वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निश्‍चित बदल्या झाल्या पाहिजेत, मात्र त्यासाठी गतवेळेसारखा ‘लक्ष्मीदर्शन’चा अनुभव येऊ नये, अशी अपेक्षा महापालिकेतील प्रामाणिक व कष्टाळू कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. 

सोलापूर - वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निश्‍चित बदल्या झाल्या पाहिजेत, मात्र त्यासाठी गतवेळेसारखा ‘लक्ष्मीदर्शन’चा अनुभव येऊ नये, अशी अपेक्षा महापालिकेतील प्रामाणिक व कष्टाळू कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. 

तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी तब्बल १५० ते २०० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते, मंजुरीही दिली होती. ‘लक्ष्मीदर्शन’ न झाल्याने मंजुरीनंतरही एक महिना संबंधितांना बदली व पदोन्नतीचे आदेश देण्यात आले नव्हते. बदल्या असो वा पदोन्नती, त्याची यादी करण्याचे काम एका खास कर्मचाऱ्याकडे होते. ‘लक्ष्मीदर्शन’ची आस असलेल्या अधिकाऱ्यांचा ‘तो’ लाडका होता. त्यामुळे ‘कडक’ प्रशासन प्रमुख आले, तरी त्याला हलविण्यात कोणालाही यश आले नाही. ‘सकाळ’ने हा प्रकार उघडकीस आणल्यावर त्याची विभागीय कार्यालयात बदली करण्यात आली. ‘जीईडी’मध्ये काही बदल झाला असेल, असे वाटत होते, पण रोजंदारी कर्मचाऱ्याला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यासाठी हजारो रुपये मागणारे अजून त्या ठिकाणीच आहेत. त्यांचीही बदली करण्याची गरज आहे.  

बदल्या, पदोन्नती किंवा नवीन नियुक्‍त्या होणार असल्या, की संबंधित कर्मचाऱ्याचे ‘कर्तव्य’ सुरू होते. संबंधितांना दूरध्वनी करणे. ‘मुदतवाढ किंवा इच्छित ठिकाणी बदली हवी आहे ना, मग भेटायला या’ असा संदेश दिला जातो. जे लोक जात नाहीत, त्यांचे काम होत नाही, जे जातात त्यांचे काम त्वरित होते, असा आजवरचा अनुभव आहे. 

‘अंजूचा चहा’ आजही प्रचलित
तीन वर्षांनंतर नियमानुसार बदल्या अपेक्षित असताना, २४ ते २५ वर्षे एकाच टेबलवर, एकाच खात्यात काम करणारे खूपजण आहेत. बदल्या करते वेळीही ‘अंजूचा चहा’ पॅटर्न वापरला जातो. शिपायापासून ते वरिष्ठ श्रेणी लिपिकापर्यंत मध्यस्थामार्फत ‘रक्कम’ निश्‍चित होते. आहे त्याच जागेवर राहण्यासाठी ‘डिमांड’ रक्कम पुरविली, की संबंधित कर्मचारी ‘त्याच’ खात्यात राहणे किती अत्यावश्‍यक आहे, अशी टिपणी ठेवली जाते. असा प्रकार यंदा बदल्यांवेळी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: solapur municipal corporation trasfer issue