चार पावलांच्या प्रवासासाठी सहा तास 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 3 मे 2018

माझा प्रस्ताव अजेंड्यावर घेता येऊ नये यासाठी नियोजन केले तरी, शुक्रवारी सभेच्या वेळी हा विषय तातडीचा म्हणून दाखल करून घ्यावा, अशी मागणी करणार आहे. चार पावलांवरील अधिकाऱ्यापर्यंत प्रस्ताव पोचायला सहा तास लागतात, हे गलथान व अनियंत्रित कारभाराचे उत्तम उदाहरण आहे. 
- रियाज खरादी, नगरसेवक, एमआयएम 

सोलापूर : महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयात मनमानी पद्धतीने अनियंत्रित कारभार कसा सुरु आहे याचे ज्वलंत उदाहरण काल पहायला मिळाले. महापालिका सभेच्या पुरवणीसाठी सकाळी अकराला दाखल झालेला प्रस्ताव चार पावलावर असलेल्या संबंधित अधिकाऱ्याकडे सायंकाळी साडेपाच वाजता पोचला. 

कायद्यातील तरतुदीनुसार सर्वसाधारण सभेसाठी सदस्यांचे किंवा प्रशासकीय प्रस्ताव मूळ विषयपत्रिकेत घेता आले नाहीत तर ते पुरवणीत घेता येतात. सभेच्या किमान एक दिवस अगोदर पुरवणी प्रसिद्ध करता येऊ शकते. मात्र प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना अडचणी येऊ शकतील असे विषय टाळण्याचे प्रयत्न महापालिकेत होत आहेत. 

स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने शेकडोच्या संख्येने प्रशासकीय प्रस्ताव थेट सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचवेळी सभासद प्रस्तावही दिले जात आहे. अजेंड्यावर प्रस्ताव येण्यासाटी सभेच्या किमान तीन दिवस अगोदर नगरसेवकांनी प्रस्ताव देणे तरतुदीनुसार अपेक्षित आहे. मात्र 28 एप्रिल ते 1 मे सलग चार दिवस सुट्या असल्याने वेळेत प्रस्ताव देता आले नाही. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सभेत हे प्रस्ताव तातडीचे म्हणून दाखल होऊ शकतात. 

एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी यांनी महापालिकेचे कामकाज प्रथेनुसार चालत असल्याने अधिनियम रद्द करावेत, असा प्रस्ताव सकाळी 11 वाजता नगरसचिव कार्यालयात दाखल केला.  पुरवणीच्या पार्श्‍वभूमीवर तो तातडीने संबंधित अधिकाऱ्याकडे जाणे क्रमप्राप्त होते. श्री. खरादी यांच्या प्रस्तावामुळे नगरसचिव कार्यालयाचा गलथानपणा उघडकीस पडण्याची शक्‍यता असल्याने, हा प्रस्ताव अजेंड्याचे विषय तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत पोचविलाच गेला नाही. सायंकाळी साडेपाच वाजता तो पाठविण्यात आला. त्यामुळे, वेळेत विषय आला नाही हे कारण देत पुरवणीवर विषय घेता येणार नसल्याचे संबंधित कर्मचाऱ्याने स्पष्ट केले. 

माझा प्रस्ताव अजेंड्यावर घेता येऊ नये यासाठी नियोजन केले तरी, शुक्रवारी सभेच्या वेळी हा विषय तातडीचा म्हणून दाखल करून घ्यावा, अशी मागणी करणार आहे. चार पावलांवरील अधिकाऱ्यापर्यंत प्रस्ताव पोचायला सहा तास लागतात, हे गलथान व अनियंत्रित कारभाराचे उत्तम उदाहरण आहे. 
- रियाज खरादी, नगरसेवक, एमआयएम 

Web Title: Solapur Municipal Corporation work process