एसएमटीच्या 58 कोटींच्या बस 'धूळखात' 

smt
smt

सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाकडील सुमारे 58 कोटींच्या 100 बस धुळखात पडून आहेत. दरम्यान, उत्पन्नवाढीसाठी व्हाल्व्हो भाड्याने देण्याचा प्रस्ताव असल्याचे व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी "सकाळ'ला सांगितले. 

श्री मल्लाव पदावर येण्यापूर्वी 22 बस मार्गावर होत्या. सध्या 60 बस मार्गावर आहेत. आणखी 20 बस मार्गावर आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपक्रमाच्या उत्पन्नवाढीसाठी 10 व्हॉल्वो भाड्याने देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यावर निर्णय झाल्यास परिवहन उपक्रमाचे उत्पन्न वाढू शकते, असा दावा मल्लाव यांनी केला. सध्या परिवहन उपक्रमाला रोज दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. प्रवास आठ ते नऊ हजार किलोमीटर आहे. वास्तविक हा प्रवास दैनंदीन 28 ते 30 हजार किलोमीटर असणे अपेक्षित आहे. मात्र त्यासाठी पुरेशा बसची संख्या असणे आवश्‍यक आहे. निकषानुसार 40 हजार लोकसंख्येच्या मागे एक बस याप्रमाणे सुमारे 500 बस असणे आवश्‍यक आहे. सध्या फक्त 60 बस मार्गावर आहेत. परिवहन उपक्रमाचा दर महिन्याचा खर्च 1 कोटी 20 लाखांपर्यंत आहे, प्रत्यक्षात उत्पन्न 80 ते 85 लाखापर्यंत आहे. त्यामुळे दैनंदिन तूट वाढतच चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर बसची संख्या वाढविणे हाच एकच पर्याय परिवहन उपक्रमासमोर असणार आहे. 

उत्पन्नवाढीसाठी शंभर मार्गावर बससेवा सुरु करण्यासह मोबाईल टॉवर बसवावेत या व इतर शिफारशींचा समावेश असलेले 80 कोटी 42 लाख रुपयांच्या परिवहन उपक्रमाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. बसभाड्यापासून 17 कोटी 50 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. महिला व बालकल्याण समितीकडून मुलींना मोफत प्रवास या अंतर्गत सव्वादोन कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित धरले आहे. सात रस्ता डेपो बीओटीवर विकसीत करण्यापासून 26 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तर महापालिकेकडून 37 कोटी रुपयांचे अनुदान अपेक्षित असताना पालिकेने फक्त 11 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. 

अशा आहेत अंदाजपत्रकातील शिफारसी 
ग्रामीण व शहरी विभागात समन्वय ठेवून परिवहन सेवा द्यावी, ई टेंडरिंगचा वापर करावा, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, फायद्यावरील मार्ग सुरु ठेवण्यासह तोट्यातील मार्ग बंद करावेत, ऍडव्हानची रक्कम घेतलेल्या सेवकांचे वेतन थांबविण्यात यावे, परिवहनच्या कार्यालयात सौर उर्जेचा वापर करावा, सात रस्ता व राजेंद्र चौक डेपो येथे मोबाईल टॉवर उभारून उत्पन्न मिळवावे. 

अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार प्रशासनाने कार्यवाही करावी. परिवहन उपक्रमाचे उत्पन्नवाढीसाठी आवश्‍यक असलेल्या शिफारशींवर तातडीने कार्यवाही करावी. 
- तुकाराम मस्के, सभापती 

परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तोटा कमी करण्याचेही नियोजन केले आहे, त्याचवेळी कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 
- अशोक मल्लाव, व्यवस्थापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com