Vidhan sabha 2019 : राष्ट्रवादीच्या उमेदवारानेही दिला संजय शिंदे यांना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

संजय घाटणेकर आणि संजय शिंदे हे जिवलग मित्र असल्याने आज मित्रासाठी आपण शिंदे यांना पाठिंबा देत असून त्यांना करमाळ्याचा आमदार केल्याशिवाय मागे हटणार नसल्याची प्रतिक्रिया घाटणेकर यांनी दिली. 

सोलापूर : करमाळा विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. वेळापूरच्या (ता. माळशिरस) सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बाबतची घोषणा केली होती. पक्षाने पाठिंबा दिला तरीही उमेदवार संजय पाटील घाटणेकर यांनी पक्षाच्या या निर्णयावर सडकून टीका केली होती. घाटणेकर आणि शिंदे हे जिवलग मित्र असल्याने आज मित्रासाठी आपण शिंदे यांना पाठिंबा देत असून त्यांना करमाळ्याचा आमदार केल्याशिवाय मागे हटणार नसल्याची प्रतिक्रिया घाटणेकर यांनी दिली. 

करमाळा तालुक्‍यातील विटमध्ये झालेल्या जाहीर सभेत घाटणेकर यांनी शिंदे यांची गळाभेट भेट घेत आपण शिंदे यांच्यासोबत असल्याचा संदेश दिला आहे. करमाळ्यातून शिवसेनेच्या रश्‍मी बागल, अपक्ष संजयमामा शिंदे व शिवसेनेचे बंडखोर आमदार अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांच्यात लढत होत आहे.

दरम्यान, शिंदे यांना सुरवातीला माजी आमदार जयवंतराव जगताप व नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला. आज घाटणेकर यांनीही पाठिंबा दिल्याने करमाळ्याच्या लढतीत आता अधिक चुरस निर्माण झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur ncp candidate supports karmala independent candidate