सोलापूर राष्ट्रवादी फुटीच्या मार्गावर? 

प्रमोद बोडके
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

- अजित पवारांच्या भूमिकेचे काही ठिकाणी स्वागत अन्‌ पुतळा जाळून निषेध 
- सोलापूरात नव्या, जुन्यांचा छुपा वाद 

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने संतप्त झालेल्या सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या गटाने निषेधाची भूमिका घेतली आहे. शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी मात्र अजित पवारांच्या भूमिकेचे समर्थन करत त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

हेही वाचा : अविश्‍वसनीय!; सर्वसामान्यांची प्रतिक्रिया 
सोलापूर शहरासह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नव्या आणि जुन्यांचा छुपा वाद आहे. शरद पवार समर्थक विरुद्ध अजित पवार समर्थक हा वाद राष्ट्रवादी एकसंध असतानाही अधून-मधून दिसत होता. या वादाने आज उघड स्वरूप दाखविले आहे. माजी नगरसेवक दीपक राजगे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, सेवा दलचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, शंतनू साळुंखे यांनी अजित पवारांच्या पुतळ्याचे दहन करून मुर्दाबाद व निषेधाच्या घोषणा दिल्या. शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी अजित पवारांच्या भूमिकेचे समर्थन करताना ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. हे प्रश्‍न सोडविण्याची धमक अजित पवार यांच्यात आहे. कोणाला काहीही वाटेल परंतु अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा योग्य असून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. 

हेही वाचा : आमचं ठरलं!; भाजपला सदनात बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद पवार 
जिल्ह्याच्या गटाकडे लक्ष 
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातही मोहोळ, माढा, माळशिरस, करमाळा, पंढरपूर या तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अजित पवार समर्थक व शरद पवार समर्थक असे दोन गट कार्यरत आहेत. अजित पवार ब्रिगेड नावाने ओळखले जाणारे नेते येत्या काळात कोणत्या पवारांसोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur Ncp on split