कर्जमाफीच्या लाभासाठी दीड महिना थांबा - सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

सोलापूर - 'यापूर्वी शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीतील त्रुटी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करत आहोत. यापूर्वीही मुंबईतील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. कर्जमाफी पारदर्शक होण्यासाठी शेतकऱ्यांकडून आता अर्ज भरून घेतले जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माफीचा लाभ मिळेल. दीड महिन्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेल,'' अशी माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी दिली.

मंत्रिपदाला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज देशमुख यांचा वार्तालाप आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे उपस्थित होते. देशमुख म्हणाले, 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत खरिपाच्या पेरण्यांसाठी दहा हजार रुपयांचे तातडीचे कर्ज देण्यात येत आहे. या योजनेतून कर्ज घेण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची मागणी नाही. गेल्या वर्षभरात सहकार विभागात काम करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले व त्यांचे सहकार्यही मिळाल्याचे सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा बॅंकांनी सोसायट्यांना अनेक वर्षांपासून लाभांश दिला नाही, त्याबद्दल जिल्हा बॅंकांनी आत्मचिंतन करावे. शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये, असे ते म्हणाले.

यंदा तशीच स्थिती कापसाच्या बाबतीत होण्याची शक्‍यता आहे. मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. यावर्षी खरेदी केलेली तूर गोदामात आहे. नवीन तूर येईपर्यंत गोदाम रिकामे होण्याची शक्‍यता कमी आहे. तूर आणि कापूस साठवण्यासाठी गोदामांची व्यवस्था केली जाईल, असा विश्‍वासही सहकारमंत्री देशमुख यांनी व्यक्त केला.

Web Title: solapur news 1.5 month stop for loanwaiver benifit