गटशेतीसाठी दोनशे कोटीची तरतूद - मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

शेतीपंपांना सोलार फीडर पुरवणार; सोलापूर जिल्ह्यात विहीर पुनर्भरण, शेततळ्यांच्या कामाची पाहणी

शेतीपंपांना सोलार फीडर पुरवणार; सोलापूर जिल्ह्यात विहीर पुनर्भरण, शेततळ्यांच्या कामाची पाहणी
सोलापूर - 'राज्य शासनाने गटशेती प्रकल्प व्यापक स्तरावर राबवण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी दोनशे कोटींची तरतूद केली आहे. शिवाय सिंगल फेजमुळे शेतीपंपांना पुरेसा वीजपुरवठा होत नाही, त्यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांना सोलार फीडर पुरवण्याचा विचार आहे,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील विहीर पुनर्भरण, शेततळ्यांच्या कामाची पाहणी केली. या वेळी ते बोलत होते. फडणवीस यांनी सांगोला तालुक्‍यातील मानेगाव येथील विहीर पुनर्भरण, कंपार्टमेंट बंधाऱ्याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी दक्षिण सोलापुरातील मंद्रूप येथील सीतामाई तलावाच्या खोलीकरणाचा आणि तसेच नांदणी येथील विहीर, बोअर पुनर्भरण, शेततळे आदी कामांची पाहणी त्यांनी केली. या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र आदी या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, 'शेतकऱ्यांनी संघटित होऊन, कमी क्षेत्रावर शेतीचे प्रयोग करणे सोईचे आणि फायद्याचे आहे. सरकार त्यासाठी सर्वोतपरी साह्य द्यायला तयार आहे. त्याच धोरणाचा भाग म्हणून 200 कोटीची तरतूद केली आहे. जलयुक्त शिवार योजना ही आता सरकारची न राहता लोकांची झाली आहे. सातारा, सांगली, वर्धामध्ये या आधी जाऊन आलो. वर्ध्यात तर आदिवासी भागात ही कामे जोरात सुरू आहेत. यापुढे "गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार' हे अभियान राबवायचे आहे. गाळयुक्त शिवारमुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन जमिनी सुपीक होतील. त्यामुळे उत्पादनही वाढणार आहे. टप्प्याटप्प्याने 40 हजार तलावातील गाळ काढण्यात येणार आहे.''

शेतकऱ्यांचे प्रश्‍न, मुख्यमंत्र्यांची उत्तरे
नांदणी येथील मुतण्णा बंडे यांच्या शेततळ्याची, सोमशेखर स्वामी यांच्या बोअर पुनर्भरणाची आणि मच्छिंद्र बंडे यांच्या गांडूळखत प्रकल्पाची पाहणी फडणवीस यांनी केली. तसेच तिथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी संवादही साधला. त्या वेळी शेततळ्याचे अनुदान कमी आहे, विजेचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नाही, यासंबंधी नांदणीतील शेतकऱ्यांनी प्रश्‍न विचारले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'शेततळ्याचे अनुदान वाढीबाबत सरकार विचार करते आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे अनुदान वाढवण्याबाबत निश्‍चित विचार करू.'' तर विजेच्या बाबतीत सिंगल फेजमुळे पाणी असूनही काही भागात पाणी देता येत नाही, सातत्याचे भारनियमन होते, या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले, 'वीज प्रश्‍नावरही विचार सुरू आहे. शेतीपंपांना शाश्‍वत वीजपुरवठा मिळावा, यासाठी थेट सोलार फीडर बसवण्याचा विचार आहे. त्यासंबंधीचे काम सुरू आहे.''

Web Title: solapur news 200 crore provision for group agriculture