'विनाअनुदानित'चे 22 हजार प्राध्यापक बेमुदत संपावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

प्राध्यापकांना पगार सुरू व्हावी, हीच प्रमुख मागणी आहे. त्यासाठी बेमुदत बंद व मोर्चा काढला जाणार आहे. यामध्ये प्राध्यापकांनी सहभागी व्हावे.
- अमरसिंह खांडेकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती, सोलापूर

सोमवारी नागपूरच्या विधानभवनावर मोर्चा; 22 हजार 500 प्राध्यापकांना पगार देण्याची मागणी

सोलापूर: राज्यात जवळपास तीन हजार 200 विनाअनुदान तत्त्वावर सुरू असलेली कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये जवळपास 22 हजार 500 प्राध्यापक अध्यापनाचे काम करतात. मात्र, गेल्या 16 ते 17 वर्षापासून ते बिनपगारी आहेत. या प्राध्यापकांना पगार मिळावी, या मागणीसाठी सोमवारपासून (ता. 11) महाविद्यालये बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्याचबरोबर 11 डिसेंबरला नागपूरच्या विधानभवनावर मोर्चा काढला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्यावतीने याबाबतचे निवेदन शिक्षण विभागाला दिले आहे. राज्यातील जवळपास तीन हजार 200 कनिष्ठ महाविद्यालयांपैकी तेराशे ते चौदाशे महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे. मात्र, अद्यापही त्यांना अनुदानास पात्र म्हणून घोषित केले नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 11 डिसेंबरपासून महाविद्यालये बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्याचबरोबर राज्यातील जवळपास 22 हजार शिक्षक 11 नोव्हेंबरला विधानभवनावर होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. संघटनेच्यावतीने राज्यभर जवळपास 206 वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने केली आहेत. मात्र, शासनाने अद्यापही कोणताही निर्णय न घेता केवळ आश्‍वासने दिली आहेत. त्याचा फटका राज्यातील या प्राध्यापकांना बसत आहे. महाविद्यालये बंद ठेवल्याने होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस शासन जबाबदार राहील, असेही संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

11 नोव्हेंबरला काढल्या जाणाऱ्या मोर्चामध्ये आमदार दत्तात्रय सावंत, विक्रम काळे, ना. गो. गाणार, श्रीकांत देशपांडे, भगवान साळुंखे, कपिल पाटील, सुधीर तांबे, बाळाराम पाटील उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील शिक्षण निरीक्षक सूर्यकांत सुतार यांना संघटनेने निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमरसिंह खांडेकर, श्रीधर सगेल, काशिराया हाविनाळे, युवराज लेंगरे, दिनेश वाडकर, अनिल धोत्रे, मल्लाप्पा लोणी, प्राचार्य सुबोध सुतकर, विश्‍वनाथ घाटे उपस्थित होते.

Web Title: solapur news 22 thousand unemployed professors on strike