महापालिका निवडणुकीतून 41 उमेदवार 'आउट'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

सोलापूर - महापालिका निवडणुकीचा हिशेब वेळेत न दिलेल्या 41 पराभूत उमेदवारांना विभागीय आयुक्तांनी तीन वर्षांपर्यंत निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. या संदर्भातील आदेश महापालिकेस मिळाले आहेत. बंदी घातलेल्यांमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांचा समावेश आहे.

महापालिका निवडणूक कायद्यानुसार निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत हिशेब सादर करणे आवश्‍यक आहे. या उमेदवारांनी वेळेत खर्च सादर केला नाही. सुनावणीवेळी ते किंवा त्यांचे प्रतिनिधी गैरहजर राहिले. हिशेब सादर न केलेल्या उमेदवारांबाबत तीन महिन्यांत निर्णय घेणे बंधनकारक असून, त्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी बंदीचा निर्णय घेतला.

निवडणुकीच्या बंदीचा आदेश 18 जून 2017 रोजी काढला आहे. त्यानुसार 17 जून 2020 पर्यंत या उमेदवारांना महापालिकेची निवडणूक बंदी असेल. पालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. त्यामुळे हे अपात्र उमेदवार त्या निवडणुकीस पात्र ठरतील, मात्र जून 2020 पूर्वी एखादी पोटनिवडणूक लागली तर त्यांना उभारता येणार नाही.

Web Title: solapur news 41 candidate out in municipal election