प्रसूतीसाठीही हवा "आधार' 

अशोक मुरुमकर/ श्रीनिवास दुध्याल
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सोलापूर - प्रसूतीची नोंद ठेवताना आता मातांचे आधार कार्ड व वयाची नोंद ठेवण्याच्या सूचना नवी दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरणाने खासगी व सरकारी रुग्णालयांना दिल्या आहेत. याबरोबर सात दिवसांत कोणत्या वयोगटातील किती प्रसूती होतात, याचीही माहिती तयार करण्याचा आदेश प्राधिकरणाने दिला आहे. 

सोलापूर - प्रसूतीची नोंद ठेवताना आता मातांचे आधार कार्ड व वयाची नोंद ठेवण्याच्या सूचना नवी दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरणाने खासगी व सरकारी रुग्णालयांना दिल्या आहेत. याबरोबर सात दिवसांत कोणत्या वयोगटातील किती प्रसूती होतात, याचीही माहिती तयार करण्याचा आदेश प्राधिकरणाने दिला आहे. 

काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इचलकरंजी येथे कुमारी महिलेच्या बेकायदा प्रसूतीची घटना उघकीस आली होती. नवी दिल्ली येथील केंद्रीय दत्तक प्राधिकरणाने त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. राज्यातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, सांगली आदी जिल्ह्यांत केंद्रीय दत्तक प्राधिकरण, जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व बाल कल्याण समिती यांच्या पथकाने खासगी व सरकारी रुग्णालयांना अचानक भेटी देऊन प्रसूतीदरम्यान रुग्णांची कशाप्रकारे माहिती ठेवली जाते, याची तपासणी केली. तेव्हा आवश्‍यक ती माहिती ठेवली जात नसल्याचे समोर आले. तेव्हा यापुढे प्रसूतीसाठी आलेल्या प्रत्येक महिलेचे आधार कार्ड ठेवण्याच्या सूचना दिल्या. 

आधार कार्ड नसेल, तर पतीचे, पतीचे आधार कार्ड नसेल, तर आई किंवा वडील यांचे आधार कार्ड आवश्‍यक आहे. यामुळे कुमारींच्या प्रसूती व बेकायदा गर्भपात याला आळा बसणार आहे, असे केंद्रीय दत्तक स्त्रोत संस्था सल्लागार समितीचे सदस्य (दिल्ली) शिवानंद डंभळ यांनी सांगितले. डंभळ म्हणाले, ""अनेक ठिकाणी गर्भात व प्रसूतीवेळी कोणतीही कागदपत्रे तपासली जात नाहीत. त्यामुळे बेकायदा गर्भपात वाढत आहेत. 18 वर्षे वयोगटापर्यंत किती प्रसूती होतात, याच्याही नोंदी ठेवल्या जात नाहीत.'' 

संपर्क साधण्याचे आवाहन 
प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे आधार कार्ड आवश्‍यक आहे. त्यामुळे 18 वर्षे वयोगटापर्यंत होणाऱ्या प्रसूतींना आळा बसणार आहे. आधार कार्ड व इतर माहिती देण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास महिला व बाल विकास अधिकारी, बाल संरक्षण समिती, बाल कल्याण समिती यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर बाल विकास अधिकारी पोलिसांत तक्रार देतील. याबाबत पोलिसांनाही माहिती दिली जाणार असल्याचे डंभळ यांनी सांगितले. 

Web Title: solapur news Aadhaar card for delivery