पीकविमा भरण्याचा आज शेवटचा दिवस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 जुलै 2017

केंद्राकडून मुदतवाढ मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष

केंद्राकडून मुदतवाढ मिळणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
सोलापूर - यंदाच्या खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा भरण्यासाठी उद्या (सोमवारी) शेवटचा दिवस आहे. आज सर्व बॅंकांना सुटी असूनही पीकविम्यामुळे बॅंका सुरू ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती, त्यामुळे त्याबाबत काही निर्णय होतो का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या वर्षी पंतप्रधान पीकविमा भरण्याचा मुद्दा ऑनलाइन पद्धतीमुळे चर्चेत आला आहे. सुरवातीच्या काळात विमा भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला होता. मात्र, जसजशी शेवटची तारीख जवळ येऊ लागली, तसतशी शेतकऱ्यांची गर्दी वाढत गेली. शेवटी शासनाने ऑफलाइन पद्धतीने विमा भरण्यास परवानगी दिली. शेवटचे काही दिवस शिल्लक असल्यामुळे राज्यातील अनेक बॅंकांमध्ये विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे त्याठिकाणी पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. पावसाने पाठ फिरवली असली, तरी विम्याच्या माध्यमातून पेरणीसाठी झालेला खर्च तरी पदरात पडेल, अशी भावना शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे विमा भरण्यासाठी बॅंकांसमोर रांगा दिसू लागल्या आहेत.

चुकीच्या पद्धतीचा शेतकऱ्यांना फटका
खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी कोणत्या मंडलामध्ये कोणते पीक निश्‍चित करायचे, याबाबत गंभीर चुका झाल्याचे दिसून येते. एखाद्या भागामध्ये संबंधित पिकाची लागवड खूपच कमी असली, तरी त्या भागामध्ये त्या पिकाचा विमा भरण्याचे निश्‍चित केले आहे. खरेतर ज्या पिकांची लागवड जास्त आहे, त्या पिकांचा विमा भरण्यास परवानगी देणे अपेक्षित असते. मात्र, बऱ्याच ठिकाणी असे घडले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांपर्यंत केल्या आहेत. या चुकीच्या पद्धतीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Web Title: solapur news agriculture insurance sumbmission last day