कृषिपंपांचा वीजपुरवठा होतोय खंडित

संतोष सिरसट
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

महावितरणची राज्यभर मोहीम; 19 हजार 885 कोटी रुपयांची थकबाकी

महावितरणची राज्यभर मोहीम; 19 हजार 885 कोटी रुपयांची थकबाकी
सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी देऊन सरकारने दिलासा दिला आहे. मात्र, त्याची वसुलीही वेगळ्या मार्गाने सुरू केली आहे. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडे थकीत असलेली कृषिपंपांची वीजबिले भरण्याचा तगादा सुरू आहे. वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या वतीने मागील तीन-चार दिवसांपासून राज्यभर वसुलीची मोहीम सुरू आहे. राज्यात महाविरणकडे कृषिपंपांचे सुमारे 42 लाख ग्राहक आहेत. त्यापैकी जवळपास 30 ते 35 लाख शेतकरी ग्राहक हे थकबाकीदार आहेत.

त्यांच्याकडे 19 हजार 885 कोटी 92 लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या थकबाकीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. मात्र, यंदा चांगले पाऊसपाणी झाल्यामुळे महावितरणने वसुली सुरू केली आहे. चालू दोन महिन्यांची बिले भरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

महावितरणच्या या मोहिमेला अनेक ठिकाणी विरोधही होऊ लागला आहे. चांगल्या पाऊसमानामुळे चांगले उत्पादन येण्याचा अंदाज आहे. त्यातच यंदा सरकारने दीड लाख रुपयांची कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार हे गृहीत धरून महावितरणने राज्यभर वसुली सुरू केली आहे. यासाठी थेट रोहित्राचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. राज्यात यंदा चांगला पाऊस झाला, हे जरी खरे असले तरी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. मूग, उडीद, सोयाबीनला बाजारात अतिशय कमी भाव मिळत आहे. सरकारने हमीभाव केंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्यापही ती जोमाने सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच महावितरणने वसुलीची मोहीम तीव्र केल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.

बिलांचा पत्ताच नाही
कृषिपंपांचे वीजबिल शेतकरी भरत नसल्याने महावितरणही शेतकऱ्यांना वीजबिल देत नाही. त्यामुळे आपल्याकडे किती बिल आहे, याची माहितीही शेतकऱ्यांना नाही. महावितरणचे कर्मचारी जी यादी घेऊन येतील, त्यानुसारच शेतकऱ्यांना बिल भरावे लागणार आहे.

याबाबत आम्ही अनेकदा आंदोलने केली. बीडमध्ये मोर्चा काढला होता. मात्र, कृषिपंपांच्या बिलाची वसुली करण्यावर सरकार ठाम आहे. याबाबत माझे ऊर्जामंत्र्यांशीही बोलणे झाले; परंतु शेतकऱ्यांकडून ते बिलाची वसुली करणारच आहेत.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

Web Title: solapur news agriculture pump electricity supply is broken