'डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमीन, पिकाच्या आरोग्यावर द्या लक्ष'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

असे करा बहार नियोजन 
तोडणी झाल्यानंतर एकास अडीच-अडीच या प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. साधारण 30-35 दिवस पाणी द्यावे. कमीत कमी- 60 -75 दिवस बागेस विश्रांती द्यावी. नवीन बहार घेण्याच्या 20-22 दिवस अगोदर दिवसाआड झाडाखाली चाळणी, मुळांची छाटणी व हलकी छाटणी करावी. 

सोलापूर - ""डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमीन आणि पिकाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. त्यावरच उत्पादनाची क्षमता ठरू शकते. त्यामुळे कोणतीही खते वा औषधे सरसकट न टाकता, त्यांच्या आरोग्याची तपासणी करूनच पुढील उपचार करावा,'' असे मत पुण्याच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विनय सुपे यांनी रविवारी (ता. 17) येथे व्यक्त केले. 

"सकाळ-ऍग्रोवन' आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनात "डाळिंबाच्या दर्जेदार उत्पादनासाठी सुधारित तंत्रज्ञान व तेलकट डागाचे नियंत्रण' या विषयावर डॉ. सुपे बोलत होते. अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, राजाभाऊ येलपले आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. सुपे म्हणाले, ""डाळिंबाची लागवड करताना गुटीकलम, छाट कलम किंवा बी लागवडीच्या पद्धतीने करावी. टिश्‍युकल्चरबाबत मात्र थोडीशी चिंता वाटते. त्याबाबत कोणत्याही विद्यापीठाने शिफारस केलेली नाही. तरीही त्याचा आग्रह धरला जातो, पण त्याचा फेरविचार व्हावा असे वाटते. एकसारखे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर, थोडी श्रद्धा, सबुरी ठेवा, घाईगडबड न करता खते, औषधे आणि पाण्याचे नियोजन व्हायला पाहिजे. पाणी देण्याची पद्धतही बदलली पाहिजे. झाडाच्या बुडात ड्रीपचे पाइप ठेवण्यापेक्षा झाडापासून लांब, झाडाच्या सावलीपर्यंत लांब पाइप ठेवावे. त्या ठिकाणीच तंतूमय मुळ्या असतात. त्यांना पाण्याची गरज असते. त्यामुळे झाडाच्या परिसरात सातत्याने ओलावा राहील. जमिनीत वाफसा राहील. शिवाय झाड सशक्त आणि ताकदीचे बनेल.'' 

""या सर्वात डाळिंबाच्या जमीन आणि पिकाच्या आरोग्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे झाडाची ताकद समजू शकते. झाड रोगास प्रतिकारक्षम आहे, हे समजू शकेल. खतावर नियंत्रण आणता येईल. छाटणी करताना झाडाच्या चार दिशांना चार खोडे ठेवावीत, खालून येणारे फुटवे, सरळ वाढणारे सोट, आडव्या फांद्या, मेलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्यात, फांदीच्या टोकाला येणारी फळे काढत राहावीत, जमिनीपासून अडीच फुटापर्यंत फुटवे काढावेत. झाडाची मुळे कायम सूर्यप्रकाशात असली पाहिजेत,'' असे डॉ. सुपे म्हणाले. 

डॉ. सुपे यांच्या चर्चासत्रातून... 
-गुटीकलम, छाटकलमासह बी लागवड पद्धतीने डाळिंब करता येईल. 
-माती, पाणी परीक्षणाशिवाय खताचा वापर टाळा. 
-पाण्याचा वापर जपून करा, झाडाची ताकद ओळखा 
-छाटणी हलकी असावी, मध्यभाग खुला असावा. 
-छाटणी सुप्तावस्थेत करावी 

Web Title: solapur news agrowon pomegranate