पदाधिकारी व प्रशासनाच्या समन्वयाने अक्कलकोट शहर 'हागणदारीमुक्त'

राजशेखर चौधरी
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

समितीने पाहणी करून शासनास दिला अहवाल

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट नगरपरिषदेच्या पदाधिकारी आणि प्रशासनाच्या निरंतर केलेल्या प्रयत्नाला अखेर यश येऊन अक्कलकोट शहर हागणदारीमुक्त झाले आहे.

समितीने पाहणी करून शासनास दिला अहवाल

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट नगरपरिषदेच्या पदाधिकारी आणि प्रशासनाच्या निरंतर केलेल्या प्रयत्नाला अखेर यश येऊन अक्कलकोट शहर हागणदारीमुक्त झाले आहे.

गेले दोन दिवस राज्य शासनाची हागणदारी मुक्तीची टीम अक्कलकोट दौऱ्यावर होती. यावेळी त्यांनी शहरात सर्व ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली आणि कामाबाबत समाधान व्यक्त करत राज्य शासनाला शहर हागणदारी मुक्त असल्याची शिफारस केली आहे. यामुळे आता शासनाचा रखडलेल्या तिर्थक्षेत्र विकास निधी मिळण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. केवळ या अटीमुळेच तिर्थक्षेत्र विकास निधीतील मंजूर ३२ कोटी फक्त १० कोटीच मिळाल्याने शहरात रखडली होती. आता उर्वरित २२ कोटी रुपये मिळून उर्वरित कामांना गती मिळणार आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

गेल्या अनेक दिवसापासून नगराध्यक्षा शोभा खेडगी, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी निरंतर प्रयत्न चालविले होते. त्याला उत्तर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी मोलाची साथ दिली आणि अखेर हागणदारी मुक्तीत यश आले आहे. मुख्याधिकारी ठेंगल यांनी पदभार घेतल्यापासून तर या कामाला वेग आला होता. शहरात जी जुनी वापरात नसलेली शौचालये होती ती दुरुस्ती करून वापरात आणली गेली, त्याशिवाय जुना किणी रोड, वागदरी रोड याठिकाणी नवीन शौचालय संच उभे केले.

शहराच्या सर्वच भागात जिथे लोक उघड्यावर जातात त्याठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे, यामुळे शहरातील नागरिक आता उघड्यावर शौचास जाणे बंद केले आहे. गेल्या महिना भरापासून याविषयी मोठी चळवळ उभारण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांमध्ये ही याबद्दल जागृती होऊन लोकांनी स्वतःहून वैयक्तिक शौचालय बांधण्यास सुरुवात केली होती. यात अजूनही काही वैयक्तिक शौचालयाचे कामे प्रगती पथावर आहेत पण उघड्यावर जाण्याच्या प्रकाराला मात्र प्रशासनाने चांगला चाप बसला आहे. यात विरोधी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने प्रशासनाला याबाबतीत यश मिळाले आहे.

दरम्यान, केवळ या अटीमुळे शहराचा विकास रखडला होता आता ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत ही शहरवासियांची रास्त अपेक्षा आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: solapur news Akkalkot city toilet free