मिरजहून रेल्वेने करू शकतो देशभरात पाणीपुरवठा - शेखर गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

सोलापूर - भारतात यापूर्वी राजस्थानमध्ये सर्वप्रथम रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला होता. ते अंतर 130 किलोमीटरचे होते आणि आठवड्यातून तीन वेळा हा पाणीपुरवठा होत होता. गतवर्षीच्या दुष्काळात मिरजहून लातूरला 450 किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा करण्यात आला. या पाणीपुरवठ्यासाठी केलेली यंत्रणा आजही तत्पर आहे. देशातील कोणत्याही भागात पाणीटंचाई भासली, तर मिरजहून रेल्वेने सहज पाणीपुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी व भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी दिली.

सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर गायकवाड यांनी आज "सकाळ'च्या सोलापूर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. रेल्वेने पाणीपुरवठा केलेला हा प्रयोग आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुकाचा विषय झाला होता. रेल्वेच्या टॅंकरमध्ये पाणी भरण्यासाठी 13 इंचाचे पाइप आवश्‍यक होते. जळगाव येथील जैन पाइप्सला अशा पद्धतीचे पाइप बनविण्यास सांगण्यात आले. त्यांनीही रात्रभर कारखाना सुरू ठेवून 48 तासांमध्ये हे पाइप्स उपलब्ध करून दिले. मिरज रेल्वे स्थानकावरील इतर गाड्यांचे वेळापत्रक पाहून लातूरला जाणाऱ्या रेल्वेत पाणी भरले जात होते. तब्बल साडेचार महिने 26 कोटी लिटर पाणी मिरजहून लातूरला पोचविण्यात आले. रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी त्या काळात निर्माण केलेली यंत्रणा आजही उपयुक्त असून, भविष्यात देशात कोठेही मिरजहून रेल्वेने पाणीपुरवठा करता येणे शक्‍य होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

...आणि मिरज-लातूरचे "जमलं'
एकीकडे मिरजहून रेल्वेने लातूरला पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेसाठी तेथील शेतकऱ्यांनी आठ कोटी रुपये भरून पाणी विकत घेतले होते. मिरजहून लातूरला झालेल्या पाणीपुरवठ्याबद्दल अनेक चांगल्या प्रतिक्रिया आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मिरजमधील एका मुस्लिम व्यक्तीच्या मुलीच्या विवाहाची बोलणी लातूरमधील एका मुलासोबत सुरू होती. मिरजच्या व्यक्तीची आर्थिक स्थिती बिकट असल्याने लातूरवाल्यांनी होकार दिला नव्हता. मिरजवाल्यांनी लातूरला फुकट पाणी दिल्याने मिरजकरांचा दिलदारपणा पाहून लातूरच्या त्या व्यक्तीने मिरजचे स्थळ कबूल केल्याची घटनाही या रेल्वेने पाणीपुरवठा केल्यामुळे घडली असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

Web Title: solapur news all country water supply in miraj railway