अंगणवाडी सेविका सोमवारपासून संपावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

दोन लाख जणी सहभागी होणार; मागण्या मान्य होत नसल्याने पाऊल
सोलापूर - अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील जवळपास दोन लाख अंगणवाडी सेविका येत्या सोमवारपासून (ता. 11) बेमुदत संपावर जाणार आहेत.

दोन लाख जणी सहभागी होणार; मागण्या मान्य होत नसल्याने पाऊल
सोलापूर - अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील जवळपास दोन लाख अंगणवाडी सेविका येत्या सोमवारपासून (ता. 11) बेमुदत संपावर जाणार आहेत.

राज्यातील अंगणवाडी सेविकांना पाच हजार, मिनी अंगणवाडी सेविकांना तीन हजार 200 तर मदतनीसांना अडीच हजार रुपये मानधन आहे. केरळ, तेलंगण, दिल्ली या राज्यांचा विचार करता हे मानधन अतिशय तुटपुंजे आहे. सरकारने यासाठी मानधनवाढ समितीची स्थापना केली होती. या समितीने मानधन दुप्पट करण्याची शिफारस केली आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन समान करण्याचीही शिफारस केली आहे. याशिवाय सेविकांना देण्यात येणाऱ्या मानधनाच्या 70 टक्के मानधन मदतनीसांना देण्याची शिफारस सरकारला केली आहे.

याबाबत महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याबरोबर संघटनेच्या बैठकाही झाल्या. मानधन वाढ करण्याचे आश्‍वासन मुंडे यांनी दिले. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. पोषण आहार शिजविण्यासाठी देण्यात येणाऱ्या इंधन खर्चामध्ये वाढ करावी. अंगणवाडी सेविकांचे दोन महिन्याचे मानधन अद्यापही मिळाले नाही. या सगळ्या मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर जाणार असल्याचे संघटनेचे निमंत्रक सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले.

आझाद मैदानावर निदर्शने
संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित प्रश्‍नासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मंगळवारी (ता. 12) निदर्शने केली जाणार आहेत. यासाठी राज्यातून अंगणवाडी सेविका मुंबईला येतील. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने थाळीनाद आंदोलन सोमवारी (ता.11) करण्यात येणार आहे.

Web Title: solapur news anganwadi employee strike on monday