प्राणीसंग्रहालयात धावणार झुक...झुक...बाबागाडी 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 24 मार्च 2018

प्राणीसंग्रहालय सर्वांगसुंदर होण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व मदत केली जाईल. स्मार्ट सिटीतील प्राणीसंग्रहालय कसे असावे याचे उत्तम उदाहरण सोलापूर असेल यासाठी नियोजन करण्यात येईल. 
- शोभा बनशेट्टी, महापौर 

सोलापूर : महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात लवकरच झुक..झुक..बाबागाडी धावणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार असून, लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, हे संपूर्ण प्राणीसंग्रहालय सीसी टीव्हीच्या नियंत्रणाखाली येणार आहे. त्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

महापौर शोभा बनशेट्टी यांनी  अचानकपणे प्राणीसंग्रहालयास भेट दिली. त्यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे यांनी ही माहिती दिली. प्राणीसंग्रहालयात सुरु असलेल्या विविध विकासकामांचीही माहिती त्यांनी महापौरांना दिली. 

डॉ. ताजणे म्हणाल्या, "या ठिकाणी मुलांसाठी खेळण्याचे साहित्य बसविण्यात येणार आहे. सीसी टीव्ही लावल्यामुळे सुरक्षेचा प्रश्‍न मिटणार आहे. याशिवाय, या ठिकाणी मेडीसीन प्लान्ट सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना माहिती मिळेल. मगरींना लवकरच नव्या पिंजऱ्यात शिफ्ट करण्यात येणार आहे. तसेच प्राणीसंग्रहालयातील प्राणी वाढविण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.'' 

सेंट्रल झू ऍथॉरटीचे सर्व निकष पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांनी सांगितलेल्या सूचनांनुसार कार्यवाही केली आहे. वाहनांपासून प्राण्यांना प्रदूषण होणार नाही याची खास दक्षता घेतली आहे. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक प्राण्यांच्या पिंजऱ्यांवर ग्रीनशेटनेट शेड लावण्यात आले आहे, असेही डॉ. ताजणे म्हणाल्या. या ठिकाणी कंपोस्ट खत प्रकल्प करण्यात आला आहे. त्याचीही पाहणी महापौरांनी केली. 

प्राणीसंग्रहालय सर्वांगसुंदर होण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व मदत केली जाईल. स्मार्ट सिटीतील प्राणीसंग्रहालय कसे असावे याचे उत्तम उदाहरण सोलापूर असेल यासाठी नियोजन करण्यात येईल. 
- शोभा बनशेट्टी, महापौर 

प्राणीसंग्रहालयातील सर्व प्राणी निरोगी 
सीझेडएच्या निकषानुसार दक्षता घेतल्याने प्राणीसंग्रहालयातील सर्व प्राणी निरोगी असल्याचा अहवाल आला आहे. ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे, असे डॉ. ताजणे यांनी सांगितले. सध्या संग्रहालयात बिबटे ः 04, मगरी ः 17, बोनट मंकी ः 07, रेसस माकडं ः 05, सांबर ः 07, 
चितळ ः 43, काळवीट ः 32, मकाऊ ः 02, मसकली ः 05 आणि पॅराकिट्‌स ः 05 आहेत. 

Web Title: Solapur news animal orphanage