तरुणांच्या मनपरिवर्तनाचा 'एटीएस'कडून यशस्वी प्रयत्न - अतुलचंद्र कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

सोलापूर - 'काळानुसार दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलत असून, सर्व प्रकारच्या आव्हानांना लढा देण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक सक्षमपणे कार्यरत आहे. तरुण-तरुणींना दहशतवादी विचारांच्या प्रवाहात जाण्यापासून रोखण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.

सोलापूर - 'काळानुसार दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलत असून, सर्व प्रकारच्या आव्हानांना लढा देण्यासाठी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक सक्षमपणे कार्यरत आहे. तरुण-तरुणींना दहशतवादी विचारांच्या प्रवाहात जाण्यापासून रोखण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.

मनपरिवर्तन करून त्यांना नोकरी, व्यवसायासाठीही मदत केली जात आहे. आजवर 86 हून अधिक तरुण-तरुणींना आम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे,'' असे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सोमवारी सांगितले.

सोलापुरात अलीकडेच स्थापन करण्यात आलेल्या दहशतवादविरोधी पथकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी कुलकर्णी येथे आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोलापूर हे सीमेवरचे शहर असल्याने पोलिसांसोबतच दहशतवादविरोधी पथकाला दक्ष राहावे लागते. आजवर घडलेल्या घटनांचा विचार करूनच सोलापुरात "एटीएस'चा कक्ष स्थापन करण्यात आल्याचे सांगून कुलकर्णी म्हणाले, बंद खोलीत बसून संगणकाच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांना खतपाणी घातले जात आहे. धर्माच्या नावाने प्रवृत्त केले जात आहे. दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलत असताना आम्ही सायबर दहशतवादाच्या अनुषंगानेही दक्ष आहोत. सरकारने यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध करून दिला आहे.

'अल्पसंख्याक स्तरातील तरुण-तरुणींच्या सबलीकरणासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून त्यांना मदत केली जात आहे. आजवर आम्ही 86 तरुण-तरुणींना दहशतवादी प्रवाहात जाण्यासाठी रोखले आहे. धर्मगुरू, कुटुंबातील सदस्य आणि मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने तरुणांचे मनपरिवर्तन करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे,'' असेही ते म्हणाले.

मुंबई हल्ल्यानंतर अनेकदा पाकिस्तानचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचे समोर आले आहे. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे आम्ही गांभीर्याने पाहतो. दहशतवादाच्या विरोधातील लढा आणखी काही दशके तरी आपल्याला द्यावा लागणार आहे. या लढ्यात दहशतवादविरोधी पथक आणि पोलिसांसह सामान्य नागरिकांचे योगदान आवश्‍यक आहे. नागरिकांनी आमचे कान आणि डोळे व्हावे. जे काही तुम्ही ऐकताय, जे काही तुम्ही पाहताय ते आम्हाला सांगावे. सुरक्षेच्या अनुषंगाने कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये. नागरिकांनी आपली जबाबदारी म्हणून आम्हाला सहकार्य करत राहावे.
- अतुलचंद्र कुलकर्णी, प्रमुख, दहशतवादविरोधी पथक, महाराष्ट्र

Web Title: solapur news atulchandra kulkarni