सावधान.. तुमची बाईक चोरीला जावू शकते! 

परशुराम कोकणे 
सोमवार, 19 मार्च 2018

बाजारात गेल्यानंतर लोक जागा मिळेल तिथे दुचाकी लावतात. मास्टर चावीचा वापर करून दुचाकी चोरली जाते. चोरलेली वाहने शहराबाहेर नेऊन येईल त्या किमतीला विकली जातात. अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांकडे सापडणाऱ्या दुचाकी सर्रास चोरीच्या असतात. नागरिकांनी आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणीच पार्किग करावी. 
- बाळासाहेब शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

सोलापूर : चोरट्यांसाठी दुचाकी वाहन चोरी करणे हे सर्वात सोप्प काम.. रस्त्यावरून जाता-जाता दुर्लक्षीत अशी दुचाकी पाहायची. ती दुचाकी आपलीच आहे अशाप्रकारचे तिच्यावर बसायचे. मास्टर कीचा वापर करून दुचाकी चालू करायची आणि अवघ्या दोन-तीन मिनिटात पसार व्हायचे! सोलापुरात दुचाकी वाहनांच्या चोरीच्या घटना वाढल्या असून रोज सरासरी दोन ते तीन वाहने गायब होत आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून दुचाकी चोरीच्या घटना होत असल्याचे समोर आले आहे. 

सोलापुरात सिव्हील हॉस्पिटल चौक, अश्‍विनी रुग्णालय परिसर, भागवत थिएटर परिसर, मधला मारुती परिसरात दुचाकी चोरीच्या घटना घडत असतात. पैशाची गरज असणाऱ्या व्यसनी तरुणांकडून दुचाकी चोरी केल्या जात आहेत. डिलक्‍स, शाईन, पॅशन ही दुचाकी वाहने अधिक प्रमाणात चोरीला जात आहेत. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात इलेक्‍ट्रो, सिद्धेश्‍वर यात्रेच्या कालावधीत 50 पेक्षा अधिक दुचाकींची चोरी झाली होती. पोलिसांच्या मते दुचाकी चोरीमध्ये नवीन तरुण येत आहेत. घरासमोर लावलेली दुचाकी रात्रीच्या वेळी चोरीला जाण्याच्या घटनाही घडत आहेत. बहुतांश घटनांमध्ये दोन चोर यात सहभागी असतात. पैशाची तातडीने गरज आहे असे सांगून पाच-दहा हजारांना चोरीच्या दुचाकी विकल्या जात आहेत. शहरातून चोरलेल्या दुचाकी ग्रामीण भागात किंवा मग कर्नाटकात नेऊन विकल्या जातात. दुचाकी चोरटा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अनेक गुन्हे उघडकीस येतात. हातभट्टीची दारू ट्यूबमधून नेण्यासाठी चोरीच्या दुचाकी वापरल्या जात आहेत. अनेक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे उघडकीस आल्या आहेत. 

सुरक्षित पार्किंग महत्वाची.. 
कितीही घाई असली तरी सुरक्षित पार्किंगच्या ठिकाणीच वाहन लावावे. जागा मिळेल तिथे वाहन पार्क करू नका. समोरील चाकाला लावता येईल व्हील लॉक बाजारात उपलब्ध आहे. चोरी टाळण्यासाठी दुचाकीला आलार्म सिस्टीमही लावता येईल. 

आकडे बोलतात.. 
शहरात सरासरी दररोज बाईक चोरी - 2 ते 3 
मास्टर की वापरून चोरी - 95 टक्के 
गुन्हा उघडकीचे प्रमाण - 60 टक्के 

बाजारात गेल्यानंतर लोक जागा मिळेल तिथे दुचाकी लावतात. मास्टर चावीचा वापर करून दुचाकी चोरली जाते. चोरलेली वाहने शहराबाहेर नेऊन येईल त्या किमतीला विकली जातात. अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांकडे सापडणाऱ्या दुचाकी सर्रास चोरीच्या असतात. नागरिकांनी आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणीच पार्किग करावी. 
- बाळासाहेब शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

Web Title: Solapur news bike thief