सोलापूर महापालिकेत भाजप- शिवसेना युतीची शक्यता 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

महापालिकेत युती होण्यासाठी मी निवडणुकीपूर्वीपासून प्रयत्न करीत होतो. मात्र, काही नेत्यांच्या अहंकाराचा बोळा "पाइपलाइन'मध्ये अडकला होता. युती झाल्यास आनंदच आहे. त्यामुळे सोलापूरच्या विकासाची गंगा वाहू लागेल. 
-प्रा. अशोक निंबर्गी, अध्यक्ष 
सोलापूर शहर भारतीय जनता पक्ष

सोलापूर - महापालिकेत भाजप-शिवसेना युतीचे संकेत सभागृह नेते सुरेश पाटील व विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी दिले आहेत. ही युती झाली तर सध्या सुरू असलेले गटबाजीचे राजकारण थांबणार असून, शहर विकासाचे प्रश्‍नही मार्गी लागतील असे मत व्यक्त होत आहे.

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात पालकमंत्री विजय देशमुख यांनी केंद्र आणि राज्याप्रमाणे महापालिकेतही युती झाली तर बरे होईल, असे वक्तव्य केले होते. तोच धागा धरत श्री. पाटील आणि श्री. कोठे यांनी हे संकेत दिले आहेत. 

अल्पोपहाराच्या निमित्ताने श्री. पाटील यांनी शुक्रवारी दुपारी महापालिकेतील विरोधी पक्षनेता कार्यालय गाठले. सोबत उपमहापौर शशिकला बत्तुल, स्थायी समितीचे सभापती संजय कोळी, नगरसेविका श्रीकांचना यन्नम याही होत्या. श्री. कोठे यांच्यासोबत अल्पोपाहार घेतानाच या संदर्भात दिलखुलास चर्चा झाली. शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, राजकुमार हंचाटे, भारत बडुरवाले, विठ्ठल कोटा, नगरसेविका कुमुद अंकाराम, वत्सला बरगंडे, माजी नगरसेवक रमेश व्हटकर उपस्थित होते. 

अल्पोपाहाराचा आस्वाद घेतानाच युतीसंदर्भात चर्चा झाली. युती झाल्यास पालिकेतील गटबाजीला पूर्ण विराम मिळेल. सहकारमंत्र्यांच्या गटातील नगरसेवकांना काहीच महत्त्व राहणार नाही. त्यामुळे युती करावीच अशी चर्चा झाली. मात्र ही युती अलिखित असणार आहे. "एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' या पद्धतीने भाजप-शिवसेना एकमेकांना मदत करेल, असे नियोजन आहे. या संदर्भात शुक्रवारी रात्री उशिरा हे दोन्ही पदाधिकाऱयांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली.

महापालिकेत युती होण्यासाठी मी निवडणुकीपूर्वीपासून प्रयत्न करीत होतो. मात्र, काही नेत्यांच्या अहंकाराचा बोळा "पाइपलाइन'मध्ये अडकला होता. युती झाल्यास आनंदच आहे. त्यामुळे सोलापूरच्या विकासाची गंगा वाहू लागेल. 
-प्रा. अशोक निंबर्गी, अध्यक्ष 
सोलापूर शहर भारतीय जनता पक्ष

Web Title: solapur news: bjp shiv sena