...अन्‌ लाचेची रक्कम घराबाहेर टाकली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

सोलापूर - कामाचा ठेका पूर्ण झाल्यानंतर अनामत म्हणून भरलेली 14 लाख 16 हजार 645 रुपयांची रक्कम परत देण्यासाठी 80 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला आणि त्यांच्या वाहनचालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी जुळे सोलापुरातील घरातून अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक घरी आल्याचा संशय आल्याने अधीक्षक अभियंत्याने ती रक्कम वाहनचालकास घराबाहेर टाकण्यास लावली.

अधीक्षक अभियंता राजकुमार जनार्दन कांबळे (वय 53), वाहनचालक कैलास सोमा अवचारे (वय 30) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदार हे पुण्याचे ठेकेदार असून, त्यांनी 2009-10 मध्ये एकरूख उपसा सिंचन योजना कि. मी 1 ते 9 मधील मातीकाम व बांधकाम करण्याचा ठेका घेतला होता. काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा अनामत म्हणून भरलेले 14 लाख 16 हजार 645 रुपये परत मिळावेत, यासाठी त्यांनी अर्ज केला. तो अर्ज वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यासाठी अधीक्षक अभियंता कांबळे यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यातील एक लाख वीस हजारांची लाच ठेकेदाराने कांबळे यांना यापूर्वी दिली आहे. वरिष्ठ कार्यालयास पाठविलेला अर्ज मंजूर होऊन आला. रक्कम परत देण्यासाठी कार्यकारी अभियंता कार्यालयास पत्र देण्याकरिता कांबळे यांनी पुन्हा एक लाखाची मागणी केली. याबाबत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
ठेकेदाराने 80 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार मंगळवारी कांबळे याने आपल्या घरी पैसे घेऊन ठेकेदारास बोलाविले. ठेकेदाराने कांबळे यास पैसे दिले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक कांबळे याच्या घरात घुसले. कांबळे यास संशय आल्याने त्याने वाहनचालक अवचारे याला घरातील रक्कम बाहेर नेऊन टाकण्यास सांगितले. ती रक्कम घेऊन अवचारे घराच्या मागील दरवाजाने पळून गेला आणि पैसे बाहेर फेकून दिले. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: solapur news bribe amount crime