‘कॅशलेस’ची वाटचाल सोलापुरात खडतर; सेवाकर हटविण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

सोलापूर - ‘कॅशलेस’ व्यवहारांना सोलापुरात नागरिकांचा थंडा प्रतिसाद आहे. ‘कॅशलेस’ला चालना देण्यासाठी सेवाकर हटविण्याची मागणी होत आहे.

सोलापूर - ‘कॅशलेस’ व्यवहारांना सोलापुरात नागरिकांचा थंडा प्रतिसाद आहे. ‘कॅशलेस’ला चालना देण्यासाठी सेवाकर हटविण्याची मागणी होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला ‘नोटाबंदी’नंतर नागरिकांमध्ये कॅशलेस व्यवहारांबाबत जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केले. त्यानुसार नागरिकांनीही त्यांना प्रतिसाद देत डेबिट व क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन व्यवहार या माध्यमातून कॅशलेस होण्याकडे कल दाखवला होता. मात्र, ३१ मार्च २०१७ नंतर विविध बॅंकांनी सेवाकरांच्या माध्यमातून पैसे आकारण्यास सुरवात केल्याने सोलापुरातील नागरिकांची पावले पुन्हा रोख व्यवहाराकडे वळली आहेत. सध्यातरी कॅशलेस होण्याबाबतच्या सरकारच्या उपक्रमाची वाटचाल सोलापुरात खडतरच आहे. 

नोटाबंदीनंतरच्या काही दिवसांत सर्वच ठिकाणी रोख रकमेची कमतरता होती. त्यामुळे नोव्हेंबर ते मार्च महिन्यात नागरिकांनी ऑनलाइन पेमेंट करण्याला पसंती दर्शवली होती. मात्र नंतर-नंतर बाजारात रोख रक्कम उपलब्ध झाल्यामुळे लवचिकता आणि वेळेच्या बचतीकरिता रोख व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे.  ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांमध्येही वाढ झाली असली तरी ती वाढ सरकारला अपेक्षित होती त्या प्रमाणात नाही. त्याचसोबत मध्यंतरी झालेल्या हॅकिंग प्रकरणामुळे ऑनलाइन व्यवहारावरील विश्‍वसनीयता कमी झाली आहे. याबाबत सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे, असे जाणकारांनी सांगितले. कॅशलेस व्यवहारांबाबत पाठपुरावा करताना नागरिकांच्या खिशाला अतिरिक्त भार लागू न देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी सोलापुरातील सर्वच क्षेत्रांमधून होत आहे.

Web Title: solapur news cashless transaction