निर्यातदारांसाठी केंद्र सरकारची 'गुड न्यूज'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

एक सप्टेंबरपासून "सेल्फ सीलिंग' कार्यपद्धती

एक सप्टेंबरपासून "सेल्फ सीलिंग' कार्यपद्धती
सोलापूर - निर्यातदार उद्योजक, शेतकरी, उत्पादकांसाठी एक गुड न्यूज आहे. कोणताही माल परदेशात निर्यात करण्यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कंटेनर सील करावा लागायचा. आता एक सप्टेंबरपासून निर्यातदार आपला माल स्वतःच सील करू शकतील. निर्यातदारांवर विश्‍वास दाखवण्याचा हा मोठा निर्णय केंद्र सरकाराने घेतला आहे. या वृत्ताला संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज "सकाळ'शी बोलताना दुजोरा दिला.

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी महसुली काम सांभाळून निर्यात कामाचीही अतिरिक्त जबाबदारी सध्या पार पाडत आहेत. त्यामुळे एखाद्या उद्योजकाचा, उत्पादकाचा माल निर्यातीसाठी कंटेनरमध्ये भरताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट द्यावी लागायची. रिकामा कंटेनर, तसेच कंटेनरमध्ये माल भरतानाची छायाचित्रेही त्यांना घ्यावी लागायची. यामुळे कंटेनर मार्गस्थ होण्यासाठी किमान पाच ते सहा तास उशीर व्हायचा. यामुळे वेळेबरोबरच पैशांचा अपव्ययही व्हायचा. तसेच अधिकारी उपलब्ध न झाल्यास निर्यातीसंदर्भातील हालचाही ठप्प व्हायची. त्यात परत निवडणुकीसारखी खूप महत्त्वाची कामे पुढे आल्यास निर्यात मालाचा कंटेरन सीलिंग करण्यासाठी तब्बल पाच दिवस उशीर होत होता.

या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीवर एक सप्टेंबरपासून मात करता येणार आहे. यासाठी केंद्र सरकाराने निर्यातदारांसाठी सेल्फ सीलिंग ही कार्यपद्धती पुढे आणली आहे. या कार्यपद्धतीमध्ये व्यापारी स्वतः कंटेनरमध्ये माल भरेल. क्वचित प्रसंगी जर एखाद्या कंटेनरमध्ये भरलेल्या मालाबाबत शंका वाटल्यास मुंबई पोर्टवर सीमा शुल्क खात्याचे अधिकारी कंटेनरची तपासणी करू शकतील. या तपासणीचे सर्व तपशील ऑनलाइन पद्धतीने असतील; मात्र एक सप्टेंबरपूर्वी व्यापाऱ्यांनी जीएसटी क्रमांक, आयात निर्यात क्रमांक याचा वापर करून आपला माल कंटेनरमध्ये भरायचा आहे.

सेल्फ सीलिंग पद्धतीला एक सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. नव्या पद्धतीमुळे वेळ, पैसा या दोन्हींची बचत होणार असून, नव्याने माल निर्यात करण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.
- संजय कुलकर्णी, अधीक्षक, सेंट्रल टॅक्‍स पुणे

Web Title: solapur news central government good news for exporter