सोलापूरच्या दूध संघाकडून उत्पादकांची फसवणूक

संतोष सिरसट
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

सोलापूर - जिल्हा दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांची व सरकारचीही फसवणूक सुरू केली आहे. सरकारच्या 19 जूनच्या आदेशाप्रमाणे गाईच्या दुधाला प्रतिलिटर 27 रुपये भाव देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाने कागदोपत्री 27 रुपयांचा भाव दाखविला आहे. मात्र, निपटारा शुल्काच्या नावाखाली प्रतिलिटर तीन रुपयांची लूट दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून सुरू केली आहे.

पुण्याच्या विभागीय उपनिबंधकांनी 6 जुलैला संघाला नोटीस देऊन सरकारने दिलेला भाव उत्पादकांना देण्याच्या सूचना दिल्या होत्या. संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक व त्यांच्या संचालकांनी त्यावर मात करत कागदोपत्री प्रतिलिटर 27 रुपये भाव दाखविला आहे. एकीकडे 27 रुपये प्रतिलिटरचा भाव दिल्याचे दाखविला असताना दुसरीकडे निपटारा शुल्काच्या नावाखाली उत्पादकांकडून प्रतिलिटर तीन रुपयांची वसुली सुरू केली आहे.

जिल्हा दूध संघाने केवळ दूध उत्पादक शेतकऱ्यांचीच फसवणूक केली नाही तर, सरकारचीही फसवणूक केली आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे दर दिला असल्याचे संघाने पुण्याच्या विभागीय उपनिबंधकांना कळविले आहे. त्याचबरोबर हा भाव देताना कशा पद्धतीने अडचणी येतात, याचेही विवेचन त्यांनी केले आहे.

Web Title: solapur news The cheating of producers from Solapur's milk team