अधिकाऱ्यांच्या दुकानदारीला आयुक्तांकडून चाप 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 17 जानेवारी 2018

सोलापूर - अंदाजपत्रकाच्या रकमेची विभागणी करून छोट्या रकमेच्या निविदा काढण्यास आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या संगनमताने चालणारी अधिकाऱ्यांची दुकानदारी बंद होणार आहे. 

सोलापूर - अंदाजपत्रकाच्या रकमेची विभागणी करून छोट्या रकमेच्या निविदा काढण्यास आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या संगनमताने चालणारी अधिकाऱ्यांची दुकानदारी बंद होणार आहे. 

आपल्या मर्जीतील मक्तेदाराला काम द्यायचे असेल तर या पद्धतीचा बिनबोभाट वापर केला जातो. अशा पद्धतीने काम करण्याची माहिती नगरसेवकांना नसते, पण काही अधिकारीच नगरसेवकांना तशा पद्धतीने कामे सुचविण्यास सांगतात. 100 मीटरचा रस्ता करायचा असला तरी त्याचे दोन-तीन तुकड्यांत विभाजन केले जाते. या पद्धतीने काम केल्याने मर्जीतल्या मक्तेदाराला काम मिळते, शिवाय अधिकाऱ्यांबरोबरच संबंधित नगरसेवकांनाही "लक्ष्मीदर्शन' होते, हे उघड गुपित आहे. 

महापालिकेत वर्षानुवर्षे अशा पद्धतीने कामे सुरू होती, आजही आहेत. आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अशा पद्धतीने काम करणारे नगरसेवक, मक्तेदार व अधिकाऱ्यांची अडचण होणार आहे. भांडवली निधीतून ही कामे केली जातात. ही रक्कम मोठी असते, त्यामुळे होणारी कामेही तितक्‍या मोठ्या प्रमाणात अपेक्षित असतात. मात्र त्यातही कामाची विभागणी करून तुकडे केले जातात. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली तर निश्‍चितच अधिकाऱ्यांची दुकानदारी थांबणार आहे, शिवाय कामांचा दर्जाही सुधारणार आहे. 

विभागणी केल्याने होणारा परिणाम 
अर्धवट कामे होण्याचे प्रमाण वाढणार 
कामांचा दर्जा एकसारखा असणार नाही 
कोटेशन पद्धतीचे प्रमाण वाढणार 
नगरसेवकांच्या पत्रांची संख्या वाढणार 

आयुक्त डॉ. ढाकणे यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आहे, त्याचे स्वागत आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता त्यांनी घ्यावी. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे सर्वसामान्य सोलापूरकर निश्‍चित स्वागत करतील. 
- प्रा. डॉ. पुरणचंद्र पुंजाल, माजी महापौर

Web Title: solapur news Commissioner