सोलापूर: अध्यक्षपदासाठी महत्त्वाचा ठरतोय जातीचा 'फॅक्‍टर'

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

कॉंग्रेसचे नगरसेवक कोठेंच्या प्रेमात
कॉंग्रेसमधील काही नगरसेवक माजी महापौर तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे. श्री. कोठे यांना कॉंग्रेसमध्ये आणून त्यांच्याकडे शहराची सूत्रे दिल्यास शहर उत्तर आणि शहर मध्य या दोन्ही मतदारसंघांवर कॉंग्रेसची पकड निर्माण होईल. प्रदेश पातळीवर होणाऱ्या कॉंग्रेसच्या बैठकीत "सोलापुरात काय चालले आहे कोठेंचे', असा प्रश्‍न हमखास निघतो, अशीही चर्चा आहे.

सोलापूर : कॉंग्रेसमध्ये पूर्वी संघटनात्मक बांधणीला प्राधान्य देऊन पदाधिकाऱ्यांची निवड केली जायची. पण आता ही परंपरा खंडित होण्याचे संकेत मिळत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणत्या जातीचा अध्यक्ष कोणकोणत्या निवडणुकीत यश मिळवून देईल, या पद्धतीने शहर व जिल्हाध्यक्ष निवडला जाण्याची शक्‍यता कॉंग्रेस वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

सुधीर खरटमल यांची एक वर्षाची मुदत संपल्यानंतर शहराध्यक्षपदासाठी अनेकांनी पाण्यात देव ठेवले होते. श्री. खरटमल यांना वर्षानंतरही हटविले नाही, त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत ते कायम राहतील असे वाटत असताना अचानकपणे श्री. खरटमल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे "अध्यक्षपदाच्या' शर्यतीत असलेल्या अनेकांनी आपले प्यादे पुढे सरकावले आहे. माजी महापौर संजय हेमगड्डी यांचे नाव अचानक स्पर्धेत आले आहे, मात्र "याच' समाजाला किती पदे द्यायची, असा प्रश्‍न इतर समाजाच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

त्याचीही दखल श्रेष्ठींना घ्यावी लागणार आहे. प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, राजन कामत, सुनील रसाळे, अंबादास गुत्तीकोंडा हेही इच्छुक आहेत. पक्षाने आदेश दिल्यास कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची तयारी या सर्वांनी ठेवली आहे. मात्र अध्यक्षपदाचा वारसदार ठरविण्याचे अधिकार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेली शिफारस ही अंतिम असणार आहे. मात्र श्री. शिंदे यांना आगामी निवडणुकीचा विचार करूनच ही शिफारस करावी लागणार आहे. 

जिल्हाध्यक्षपदासाठी कल्याणराव काळे यांचे नाव आघाडीवर आहे. माजी आमदार दिलीप माने यांचे नाव शहर किंवा जिल्हाध्यक्षपदाच्या चर्चेत होते. मात्र त्यांनी पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून राहायचे घोषित केल्याने श्री. काळे यांच्या नियुक्तीला कोणता अडसर येणार नाही, अशी स्थिती आहे. तथापि विद्यमान अध्यक्ष प्रकाश पाटील यांना मुदतवाढ द्यायची की नवा अध्यक्ष निवडायचा, हे येत्या गुरुवारपर्यंत स्पष्ट होणार आहे. श्री. शिंदे 27 किंवा 28 सप्टेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्या वेळी यासंदर्भात निर्णय होईल, असे सांगण्यात आले. 

कॉंग्रेसचे नगरसेवक कोठेंच्या प्रेमात
कॉंग्रेसमधील काही नगरसेवक माजी महापौर तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्या प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे. श्री. कोठे यांना कॉंग्रेसमध्ये आणून त्यांच्याकडे शहराची सूत्रे दिल्यास शहर उत्तर आणि शहर मध्य या दोन्ही मतदारसंघांवर कॉंग्रेसची पकड निर्माण होईल. प्रदेश पातळीवर होणाऱ्या कॉंग्रेसच्या बैठकीत "सोलापुरात काय चालले आहे कोठेंचे', असा प्रश्‍न हमखास निघतो, अशीही चर्चा आहे.

Web Title: Solapur news Congress president