सोलापुरात होणार परवडणाऱ्या 10 हजार घरांची निर्मिती

शीतलकुमार कांबळे
मंगळवार, 20 मार्च 2018

महाराष्ट्र सरकार व क्रेडाई यांच्यामध्ये हमी करार झाला आहे. या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून म्हाडा काम पाहणार आहे. तर लाभार्थी कोण असतील, याची माहिती महापालिका देणार आहे. सध्या महापालिकेकडे 40 ते 50 हजार नागरिकांची यादी आहे. सध्या जागा पाहणे, डेव्हलपर नेमणे आदी नियोजन सुरू असून पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल.
- शशिकांत जिड्डीमणी, उपाध्यक्ष, क्रेडाई, सोलापूर

पाच वर्षांत होणार प्रकल्प पूर्ण; क्रेडाई व राज्य सरकारमध्ये करार

सोलापूर : क्रेडाई (कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) महाराष्ट्र व राज्य सरकार यांच्यामध्ये राज्यात घरे बांधण्यासंबंधी महत्त्वपूर्ण करार नुकताच झाला. या करारान्वये सोलापुरात 10 हजार घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सर्वांना घरे या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी हा करार करण्यात आला असून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात
येणार आहेत. यासाठी क्रेडाई व राज्य सरकार यांनी पुढाकार घेतला आहे.

बांधकाम व्यावसायिकांशी चर्चा करून परवडणारी घरे बांधण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या पाच वर्षांमध्ये राज्यातील 50 शहरांत अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. राज्यात पाच लाख घरांची निर्मिती होणार असून सोलापूरच्या वाट्याला 10 हजार घरे आली आहेत. क्रेडाई पूर्ण महाराष्ट्रात सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. क्रेडाई व राज्य सरकारच्या करारामुळे विविध प्रकारचे बांधकाम परवाने वेळेवर मिळू शकतात. तसेच इतर बांधकामासाठी येणाऱ्या अडचणी या प्रकल्पासमोर शक्‍यतो येणार नसल्याने या योजनेला लवकरच मूर्त स्वरूप मिळण्याची जास्त शक्‍यता आहे.

त्या चार वर्षांत 10 हजारांपेक्षा जास्त घरे बांधण्याचा आमचा संकल्प आहे. आपले पहिले घर घेणाऱ्यांसाठी सरकार सबसिडी देणार आहे. 60 चौरस मीटरपेक्षा कमी असणाऱ्या घरासाठी, ही परवडणारी घरे असणार आहेत. घरे घेणाऱ्यांसाठी बॅंकेच्या व्याजामधूनही सवलत देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन सामान्य माणूस आपले घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल.
- समीर गांधी, माजी अध्यक्ष, क्रेडाई, सोलापूर

सहा लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना मिळेल लाभ
सहा लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना मिळेल लाभ सोलापुरात राहणाऱ्या व आपले पहिले घर घेणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी असणाऱ्यांसाठी ही योजना असणार आहे. नऊ लाख रुपये ते 12 लाख रुपयांपर्यंत परवडणाऱ्या घरांची किंमत असणार आहे.

Web Title: solapur news credai home