पुण्यात शुक्रवारपासून रंगणार सोलापूर सार्थक सोहळा

परशुराम कोकणे
सोमवार, 29 जानेवारी 2018

सोलापूरकरांची एकमेकांना भेट व्हावी, खाद्यपदार्थांसह अनेक गोष्टी पुन्हा अनुभवता याव्यात तसेच पुण्यातील लोकांना सोलापूरच्या संस्कृती माहिती होण्यासाठी सोलापूर सार्थक सोहळा आयोजिला आहे. 
- लक्ष्मीकांत गुंड, आयोजक, सोलापूर सार्थक सोहळा 

सोलापूर : सोलापूरची शेंगाचटणी, कडक भाकरी, हुरडा, सोलापूरची चादर यासह सोलापूरची ओळख सांगणारं बरंच काही तुम्हाला पुण्यात एका ठिकाणी पाहण्यात येणार आहे! पुण्यातील सोलापूरकरांनी एकत्र येऊन 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात स्वारगेट परिसरात गणेश कला क्रीडा मंच येथे सोलापूर सार्थक सोहळा आयोजिला आहे. 

मूळचे सोलापूरचे पण सध्या पुण्यात असणाऱ्या तरुणांनी 2006 मधे सोलापूर मित्र मंडळाची स्थापना केली. पुण्यातील सोलापूरकरांचा शोध घेण्यात आला. 2006 ला पहिल्यांदा पुण्यातील सोलापूरकरांचा स्नेहमेळावा घेण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आजघडीला जवळपास पाच लाख सोलापूरकर नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी पहिल्यांदा सोलापूर सार्थक सोहळा आयोजिला होता. आता पुन्हा एकदा सार्थक सोहळ्यानिमित्त स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापूरचे पुण्यात मार्केटिंग होणार आहे. या उपक्रमासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीने सहकार्य केले आहे. 

सोलापूरची खाद्य संस्कृती अनुभवण्यासाठी सार्थक सोहळ्यात विविध स्टॉल असणार आहेत. सोलापुरातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था, बांधकाम व्यवसायिकांसह पुण्यात शाखा असलेल्या सोलापूरच्या बॅंकांच्या योजनांची माहितीही मिळेल. चादर, टॉवेल, गणवेशासह वस्त्रोद्योग उत्पादकांचाही सहभाग असेल. विशेष म्हणजे सोलापुरातील शेतकऱ्यांकडून हुरडाही उपलब्ध करण्यात येणार आहे. सार्थक सोहळ्यानिमित्त सोलापूरचे चित्रकार राम खरमटल यांचे प्रदर्शन आणि प्रकट मुलाखत होणार आहे. हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ कार्यक्रम, राजशेखर पंचे आणि त्यांच्या टीमचा नृत्याविष्कार कार्यक्रमही होणार आहे. 

सोलापूरकरांची एकमेकांना भेट व्हावी, खाद्यपदार्थांसह अनेक गोष्टी पुन्हा अनुभवता याव्यात तसेच पुण्यातील लोकांना सोलापूरच्या संस्कृती माहिती होण्यासाठी सोलापूर सार्थक सोहळा आयोजिला आहे. 
- लक्ष्मीकांत गुंड, आयोजक, सोलापूर सार्थक सोहळा 

सोलापूरची शेंगा चटणी आणि कडक भाकरीला पुण्यात मोठी मागणी असते. पुण्यातील सोलापूर सार्थक सोहळ्यात आम्ही यापूर्वीही सहभागी झालो होतो. या कार्यक्रमात सहभागी होऊन लाखो लोकांपर्यंत सोलापूरच्या शेंगाचटणी पोचवता येते. 
- रेशमा वसंत पवार, सदस्य, अन्नपूर्णा महिला गृहउद्योग

Web Title: Solapur news cultural programme solapur