घराचे माळवद पडून मुलीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

सोलापूर - शाळेच्या सुट्टीत आजीकडे आलेल्या दहा वर्षाच्या मुलीचा पावसामुळे घराचे माळवद पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास साखर पेठ परिसरात घडली. 

सोलापूर - शाळेच्या सुट्टीत आजीकडे आलेल्या दहा वर्षाच्या मुलीचा पावसामुळे घराचे माळवद पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास साखर पेठ परिसरात घडली. 

दिव्या दयानंद ऊर्फ बाळू गजेली (वय 10, घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) असे मृत मुलीचे नाव आहे. दिव्या ही शाळेला सुट्टी असल्याने चार दिवसांपूर्वी साखर पेठेतील चन्ना पठाण वाडा परिसरातील आजीच्या घरी आली होती. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता शहर आणि परिसरात तुफान पाऊस झाला. पावसामुळे भिजलेले घराचे माळवद अचानक कोसळले. घरात दिव्यासह इतरही मुले खेळत होती. माळवद अंगावर पडल्याने दिव्या गंभीर झाली. मामा अमित मामड्याल यांनी दिव्याला जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. 

दिव्याचे वडील दयानंद हे ठेकेदाराकडे कामाला आहेत, तर आई सुमित्रा या गृहिणी आहे. दिव्याला दोन मोठ्या बहिणी आहेत. या दुर्घटनेनंतर आईसह कुटूबींयांनी आक्रोश केला. गजेली कुटुंबीय हे तेलुगू भाषिक असून नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. 

अग्निशमन जवानाचे प्रयत्न.. 
माळवद पडल्याची वर्दी अग्निशमन दलाकडे येताच तातडीने पथक रवाना झाले, परंतु, मुसळधार पावसाने शहर परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. पथक घटनास्थळी येईपर्यंत जवळच राहणारे अग्निशमन दलाचे जवान श्रीकांत भडके हे तिथे पोचले. क्षणाचा ही विलंब न करता जवान भडके यांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढले. रुग्णवाहिकेची वाट न पाहता जवान श्रीकांत भडके, गौतम आव्हाड यांनी अग्निशमन वाहनातून दिव्या हिला शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता नेले. अग्निशमन चालक सोडेवाल यांनी काही मिनिटातच रुग्णालय गाठले. परंतु, तेथील डॉक्‍टरांनी दिव्याला मृत घोषित केले.

Web Title: solapur news death of the girl after roof collpase