सोलापूर: ई-लर्निंगमुळे वाढला विद्यार्थ्यांचा पट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

"सकाळ'ने 2016 मध्ये माझी शाळा : मिशन झेडपी व महानगरपालिका शाळा या थीममध्ये "माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा' ही सर फाऊंडेशनच्या सहकार्याने लेखमाला 133 भागांत छापली. त्यानंतर प्रिसीजन फाऊंडेशनने या मालिकेबाबत उत्सुकता दाखवित शैक्षणिक उपक्रमासाठी आपला निधी खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला.

सोलापूर : डिजीटल क्‍लासरुममुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती 10 ते 15 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. आत्मविश्‍वासाने ते संगणकाची हाताळणी करीत आहेत. शिक्षणातला लोकसहभाग वाढला आहे, अशी अनेक शैक्षणिक विश्‍वात क्रांतीकारक बदल ई लर्निंग क्‍लासरुमने घडून येत आहेत. "सकाळ'च्या "माझी शाळा- गुणवत्तापूर्ण शाळा' या वृत्तमालिकेला लागलेल्या या रसाळ फळांची दखल आंतराष्ट्रीय स्तरावर नामांकित अशा अहमदाबादच्या इंडीयन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटने घेतली आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक विश्‍वात आमुलाग्र बदल घडविणारा हा प्रकल्प अन्य शाळांसाठी दिशादर्शक आहे.

"सकाळ'ने 2016 मध्ये माझी शाळा ः मिशन झेडपी व महानगरपालिका शाळा या थीममध्ये "माझी शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा' ही सर फाऊंडेशनच्या सहकार्याने लेखमाला 133 भागांत छापली. त्यानंतर प्रिसीजन फाऊंडेशनने या मालिकेबाबत उत्सुकता दाखवित शैक्षणिक उपक्रमासाठी आपला निधी खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला. "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या शाळांना भेटी देऊन पाहणी करुन त्यांच्या गरजा जाणून घेतल्या. या पाहणीत शाळांना काळाशी जोडण्यासाठी ई लर्निंग कीट देण्याचे जाहीर केले. सुरवातीला 40 शाळा घेतल्या. त्यानंतर वाढ करुन सध्या 52 शाळांत हा प्रकल्प राबविला जात आहे. त्यासाठी सुरवातीला शिक्षकांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्याच्या वापराबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर प्रतिसाद प्रश्‍नावली भरुन घेत कार्यशाळा घेतली. त्यातून चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना बक्षिसे दिली. 

या प्रकल्पाची माहिती सहा जूनला आयआयएमच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर फाऊंडेशनच्या सदस्यांनी मांडली. त्यानंतर या प्रकल्पाचा केस स्टडी करण्याचे त्यावेळी ठरले. त्यानुसार नुकतीच 20, 21 जूनला "आयआयएम'ची चौघांची समिती आली. त्यात मेघा गज्जर, संकेत सावलीया, अजयकुमार गुप्ता, कौशिक अभिवाडकर या अभ्यासक, संशोधकांचा समावेश होता. त्यांनी जिल्हा परिषद शाळा अकोले-मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर), जिल्हा परिषद शाळा लोकुर तांडा (उत्तर सोलापूर), जिल्हा परिषद शाळा शेटेवस्ती (ता. दक्षिण सोलापूर) या "सकाळ' प्रिसीजन आणि सर फाऊंडेशनच्या प्रकल्पातील शाळांची पाहणी केली. त्याशिवाय तुलनात्मक अभ्यासासाठी लोकसहभागातून ई लर्निंग स्कूल काढलेल्या जिल्हा परिषद सोरेगाव शाळेला भेट दिली. या टीमने अकोले (मंद्रुप) शाळेत पूर्ण एक दिवस विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यासंबंधी त्यांनी अहवाल तयार केला. त्यात प्रोजेक्‍टरमुळे विद्यार्थ्यांत झालेले सकारात्म बदल अहवालात नोंदविले आहेत. 

आयआयएमच्या टीमची निरीक्षणे 
विद्यार्थ्यांत आत्मविश्‍वास वाढला 
चाईल्ड थिएटर ही संकल्पना आकर्षक 
विद्यार्थीनीनी सहज हाताळू लागल्या संगणक 
पालकांचे सहकार्य, लोकसहभाग वाढला 
यू ट्यु पाहून विद्यार्थ्यांनी नृत्यप्रशिक्षकाशिवाय बसविले नृत्य 
हा अहवाल आयआयएमच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला आहे

www.inshod.org संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: Solapur news e learning school in school