पाच वर्षांनी व्हावा शिक्षणाचा विकास आराखडाः विनोद तावडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

सोलापूर येथे झाले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण

सोलापूरः काळानुरूप शिक्षणामध्ये बदल होणे गरजेचे आहे. एखाद्या शहराचा ज्याप्रमाणे विकास आराखडा (डीपी) तयार करतो, त्याचप्रमाणे शिक्षणाचाही दर पाच वर्षांनी विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. त्याची सुरवातही केल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

सोलापूर येथे झाले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे वितरण

सोलापूरः काळानुरूप शिक्षणामध्ये बदल होणे गरजेचे आहे. एखाद्या शहराचा ज्याप्रमाणे विकास आराखडा (डीपी) तयार करतो, त्याचप्रमाणे शिक्षणाचाही दर पाच वर्षांनी विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. त्याची सुरवातही केल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

शालेय शिक्षण विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण आज (सोमवार) सोलापूरमध्ये श्री. तावडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहकारमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार भारत भालके, रामहरी रूपनवर, दत्तात्रय सावंत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील, शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त विपिन शर्मा, प्राथमिकचे शिक्षण संचालक सुनील चौहान, माध्यमिकचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे, महापालिकेच्या प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे उपस्थित होते.

श्री. तावडे म्हणाले, यापूर्वी शाळेमध्ये शिक्षकांना मोबाईल नेण्यास बंदी घातली होती. आम्ही ती बंदी उठवली. मोबाईलचा सकारात्मक वापर करण्यावर आम्ही भर दिला. त्यामुळेच राज्यात जवळपास एक लाख 47 हजार शिक्षक तंत्रस्नेही झाले आहेत. आम्ही शिक्षकांवर विश्‍वास दाखवला आहे. त्याचप्रमाणे समाजानेही शिक्षकांवर विश्‍वास दाखवायला हवा. सध्याच्या युगामध्ये शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या बरोबरीने गतिमान होणे आवश्‍यक आहे. काळानुरूप झालेले बदल स्वीकारून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायला हवे. राज्यात सुरू असलेला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा कार्यक्रम प्रगल्भ शैक्षणिक महाराष्ट्र व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सहकारमंत्री देशमुख म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देऊ नये. शिक्षणमंत्री तावडे हे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचा विचार करतील. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले उद्योगपती, आदर्श शेतकरी, चांगले राजकारणी यांची उदाहरणे द्यावीत. शालेय शिक्षण विभागामध्ये स्वच्छतेचा तास सुरू करण्याची विनंतीही श्री. देशमुख यांनी केली. श्री. नंदकुमार म्हणाले, "शाळांचे रूप बदलले आहे. राज्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्याचे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. विद्यार्थी प्रगत झाले आहे.'' माध्यमिकचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी आभार मानले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur news education Five years of development plan: Vinod Tawde