फेसबुक अकाऊंट हॅकप्रकरणात टेंभूर्णीच्या तरुणाची झाली सुटका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

सोलापूर - टेंभूर्णी (ता. माढा) परिसरातील बापू कुबेर राजगुरु या तरुणाचे फेसबुक अकाऊंट हॅक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी चुकीची पोस्ट केल्याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी सलमान हैदर यास अटक केली आहे. चौकशीसाठी बोलाविण्यात आलेल्या बापू राजगुरु याची सुटका करण्यात आली आहे. 

सोलापूर - टेंभूर्णी (ता. माढा) परिसरातील बापू कुबेर राजगुरु या तरुणाचे फेसबुक अकाऊंट हॅक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी चुकीची पोस्ट केल्याप्रकरणी गाझियाबाद पोलिसांनी सलमान हैदर यास अटक केली आहे. चौकशीसाठी बोलाविण्यात आलेल्या बापू राजगुरु याची सुटका करण्यात आली आहे. 

बापू राजगुरु याच्या फेसबुक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी चुकीची पोस्ट करण्यात आली होती. या संदर्भातील चौकशी करत गाझियाबाद पोलिस चार दिवसांपूर्वी राजगुरुपर्यंत पोचले. त्याची प्राथमिक चौकशी करण्यात आली. राजगुरु याने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयीची कोणतीही पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली नाही, मला हिंदी भाषा सुद्धा येत नाही असे पोलिसांना सांगितले. त्याच्या फेसबुक अकाऊंटची तपासणी करण्यात आली. त्याचे अकाऊंट हॅक करून कोणीतरी पंतप्रधानांविषयी पोस्ट टाकल्याचे समोर आले. याप्रकरणात राजगुरु यास अधिक चौकशीसाठी गाझियाबादला बोलाविण्यात आले होते. या प्रकरणात मूळ आरोपी सलमान हैदर यास अटक करण्यात आली असून राजगुरु यास सोडण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी दिली. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाचे सोलापूर कनेक्‍शन? चौकशीसाठी एकाला घेतले ताब्यात.. अशी पोस्ट भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य, माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी फेसबुकवर शेअर केल्याने याप्रकरणाची अधिकच चर्चा झाली. 

आपले फेसबुक अकाऊंट हॅक करून चुकीच्या पोस्ट केल्या जावू शकतात, त्यामुळे फेसबुकसह अन्य सोशल मीडीयावर वापरताना सर्वांनी दक्षता घ्यायला हवी. पासवर्ड आणि इतर माहिती कोणालाही शेअर करू नये. सोशल मीडीयावरील आपले अकाऊंट वापरात नसेल तर ते बंद करावे. आपल्या अकाऊंटवरून कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह पोस्ट करू नये, केल्यास सायबर पोलिस ठाण्याचे पथक कारवाईसाठी सज्ज आहे. 
- वीरेश प्रभू,  पोलिस अधीक्षक 

- सोशल मीडीयाच्या अकाऊंटची माहिती शेअर करू नये. 
- आपल्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह पोस्ट केल्यास होते कारवाई. 
- जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट केली असेल तर लाईक, कॉमेंट आणि शेअर करू नये. 
- आपले अकाऊंट अन्य कोणीतरी वापरत असेल तर सायबर पोलिसात तक्रार करावी.

Web Title: solapur news Facebook account hacking case the youth of Tembhurni was released