त्रास देण्यासाठी काढले जाताहेत बनावट फेसबुक अकाऊंट ! 

परशुराम कोकणे
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

सोलापूर - प्रेमभंग झाल्यावर किंवा लग्न करण्यास नकार दिल्यानंतर मुलीच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिची बदनामी करण्याचे प्रकार शहरांसोबत ग्रामीण भागातही वाढले आहेत. फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी सायबर पोलिस ठाणे सज्ज आहे. त्रास देण्याच्या उद्देशाने सोशल मीडियाचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. 

सोलापूर - प्रेमभंग झाल्यावर किंवा लग्न करण्यास नकार दिल्यानंतर मुलीच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिची बदनामी करण्याचे प्रकार शहरांसोबत ग्रामीण भागातही वाढले आहेत. फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी सायबर पोलिस ठाणे सज्ज आहे. त्रास देण्याच्या उद्देशाने सोशल मीडियाचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. 

सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या यंत्रणांकडे पूर्वी फसवणुकीच्या तक्रारी अधिक यायच्या. आता फेसबुक किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांच्या तक्रारी येत आहेत. फेसबुुक अकाऊंट काढणे सोपे असल्याने लहान मुलेही फेसबुकवर अकाऊंट काढत आहेत. एखाद्या मुलीसोबत प्रेमभंग झाल्यानंतर तिच्या नावाने फेसबुक अकाऊंट काढायचे. तिच्या मूळ अकाऊंटवरून तिची माहिती आणि फोटो डाऊनलोड करून ते बनावट अकाऊंटवर पोस्ट करायचे. मुलीच्या नावाने अकाऊंट काढून मुला-मुलींशी चॅट केले जाते. अनेकदा अश्‍लील फोटो शेअर केले जातात. खऱ्या मैत्रिणीची प्रत्यक्षात भेट झाल्यावर किंवा पोलिसांत तक्रारी दिल्यानंतर चॅटसाठी वापरलेले अकाऊंट खोटे असल्याचे लक्षात येते. बनावट अकाऊंट काढणाऱ्याचा शोध घेऊन सायबर पोलिस ठाण्यातील टीम कारवाई करते. 

अनेकजण दुसऱ्याकडून फेसबुक अकाऊंट काढून घेतात. ते कसे वापरायचे हे माहीत नसते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. फेसबुकच्या सेटींगचा उपयोग केल्यास आपले फोटो कोणीही डाऊनलोड करू शकत नाहीत. त्रास देण्यासाठी आणि टाईमपास म्हणून सोशल मीडियाचा वापर करू नये. जर कोणी त्रास देत असेल तर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 
ही घ्या काळजी.. 

  • फेसबुकच्या सेटींगमध्ये जाऊन सिक्‍युरीट सेटींग ऑन करावे 
  • फेसबुकवरील फ्रेंड लिस्ट वाढविणाच्या नादात अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका 
  • चॅटद्वारे कोणालाही वैयक्तिक माहिती किंवा फोटो देऊ नका 
  • सोशल मीडियाचा वापर करून जर कोणी त्रास देत असेल तर सायबर पोलिसांत तक्रार करा 

सायबर गुन्ह्यांमध्ये फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून त्रास देण्याचे प्रमाण अधिक आहे. मुलींची बदनामी करण्याच्या उद्देशाने ओळखीच्या लोकांकडून असे प्रकार होत आहेत. अनेकदा मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊंट चालवून चॅट करणे, अश्‍लील फोटो पाठविणे असे प्रकार घडत असतात. अशाप्रकारे सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून त्रास देणाऱ्यांचा शोध घेतला जातो. त्यांच्यावर सायबर कायद्यानुसार कारवाई केली जाते. 
- रवींद्र गायकवाड, 

सहायक पोलिस निरीक्षक, ग्रामीण सायबर पोलिस ठाणे

Web Title: Solapur News fake Facebook account issue