सोलापुरात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धार कायम!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

सोलापूर - राज्यभर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशीही मंगळवारी (ता. 6) सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. संघटनेने आधीच जाहीर केलेल्या आंदोलनाप्रमाणे शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचे आंदोलन होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते तालुक्‍याच्या तहसील कार्यालयापर्यंत मुख्य शासकीय कार्यालयांना पोलिसांचे संरक्षण होते. दुसरीकडे मोहोळ, बार्शी तालुक्‍यात रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाच्या आजच्या सहाव्या दिवशी शेतकरी आणखी आक्रमक झाल्याचे दिसून आले. नियोजनानुसार आज टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याशिवाय जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्येही बंदोबस्त होता. पण या परिस्थितीतूनही मंगळवेढ्यात शेतकरी कृती समितीने प्रांत कार्यालयाला तसेच पंढरपुरात तहसील कार्यालयाला टाळे ठोकले.

दुसरीकडे बार्शी तालुक्‍यातील नारी व भातंबरेतील आठवडी बाजार आज बंद ठेवण्यात आला. कर्जमाफीच्या मागणीसाठी भातंबरेत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

त्याचबरोबर रस्त्यावर वांगे, टोमॅटो फेकून सरकारचा निषेध करण्यात आला. पंढरपुरातील भाळवणी, वाखरीमध्येही शेतकरी तीव्र झाले होते. पानगाव, वाखरीत ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.

शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बाराच्या सुमारास बार्शी-लातूर व कळंब रस्त्यावरील कुसळंब गावामध्ये रास्ता-रोको करण्यात आला. त्यात कॉंग्रेसचे विक्रांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद, सुंदर जगदाळे आदी सहभागी झाले. याठिकाणी नवीन लग्न झालेल्या वधू-वरांनीही आंदोलनात सहभाग घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याशिवाय मोहोळ तालुक्‍यातील कुरुल येथे जनहित शेतकरी संघटेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही मोठ्या प्रमाणात रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांना मारहाण
गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात सातत्याने पोलिस आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांची दडपशाही दिसत आहे. करमाळ्यात अशा दोन घटना गेल्या दोन दिवसांत घडल्या. त्यानंतर मंगळवारी (ता.6) पुन्हा एकदा अजनसोंड (ता. पंढरपूर) येथे अशी घटना घडली. दूध संकलन बंद करण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून अजनसोंडमधील विठ्ठल दूध डेअरीचे मालक रमेश घाडगे, सुमीत घाडगे आदी 6 ते 7 जणांनी बळिराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हणमंत डुबल यांना मारहाण केली.

Web Title: solapur news farmer agitation in solapur