शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवार बाजार सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

सोलापूर - शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा म्हणून येथील मंगळवारचा आठवडी बाजार आज (मंगळवार) बंद राहील अशी चर्चा होती. मात्र, नियमितपणे आजही बाजार भरला आहे. मात्र, बहुतांश वस्तूंचे भाव वाढल्याचे आढळून येत आहे. या बाजाराला मोठी परंपरा असून गेल्या २०० वर्षांपासून हा बाजार भरत आहे.

सोलापूरसह परिसरातील गावामधील नागरिकांची सोय व्हावी यासाठी ब्रिटिशांनी १८०५ मध्ये हा बाजार सुरू केला होता. या बाजारात पालेभाज्यांसह मासे, मटण, कोंबडी विक्रीची विशेष व्यवस्था आहे. त्यामुळे सोलापूरपासून जवळ असलेल्या तांदूळवाडी, मुस्ती, मंद्रूप, बोरामणी, तामलवाडी या गावातून व काही प्रमाणात अक्कलकोट, मोहोळ, तुळजापूर या तालुक्‍यातील शेतकरी विक्रीसाठी तर नागरिक खरेदीसाठी येतात.

सकाळी आठ वाजल्यापासूनच शेतमालाची ने-आण सुरू झाली. विशेषतः टोमटो, बटाटा, मिरची, मेथी, शेपू, कांद्याची मोठी आवक होती. आंब्याचीही मोठी आवक दिसून आली. नियमित पालेभाज्यांचे दर काही प्रमाणात वाढल्याने अनेकांनी मासळी आणि कोंबडी बाजाराकडे जाणे पसंत केले. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. या ठिकाणी भरणारा भंगार विक्रीचाही बाजार नेहमीप्रमाणे भरला होता. जुन्या वस्तू, साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. 

मंगळवार बाजारातील दर - कंसात जुने दर रुपयांत
 मेथी २५ रुपये (१०),  शेपू २० (पाच),  बटाटा ८० रुपये किलो (४०),  वांगी ६० रुपये किलो (४०),  कोंबडी १५० ते ३५० रुपये (८० ते २००),  विविध प्रकारची मासळी २०० ते ८०० रुपये (१०० ते ६००).

Web Title: solapur news farmer strike band