मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्याचा मृतदेहाचे शवविच्छेदन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

मृत जाधव यांच्यावर 50 हजार रुपयांचे कर्ज आहे. राज्यात 1 ऑक्टोबरला अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असून, त्यावेळी त्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्ट केले.

सोलापूर : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या नातेवाईकाने मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला. त्यावेळी संबंधित शेतकऱ्याच्या दोन मुलांचा शिक्षणाचा खर्च व दोघांना नोकरी देण्यासाठी सकारात्मक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यावर येथील स्थानिक नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. दीड वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होती. 

करमाळा तालुक्यातील वीट येथील शेतकरी धनाजी चंद्रकांत जाधव (वय 42) यांनी कर्जाला कंटाळून बुधवारी रात्री नऊ वाजता आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी 'मी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्याशिवाय मला जाळायचे नाही,' अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती त्यांच्या खिशात सापडली. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी सकाळी तीव्र आंदोलन सुरू केले. करमाळा शहर सकाळपासून स्वयंस्फूर्तीने बंद करण्यात आले होते. 

मृत जाधव यांच्यावर 50 हजार रुपयांचे कर्ज आहे. राज्यात 1 ऑक्टोबरला अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असून, त्यावेळी त्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्ट केले. तत्पूर्वी, शेतकऱ्यांना शांत करून आंदोलन मिटविण्यासाठी आलेले पालकमंत्री विजय देशमुख यांना गावात येण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध केला. देशमुख एक तासापेक्षा अधिक वेळ करमाळ्यात बसून होते. मुख्यमंत्री आल्याशिवाय शवविच्छेदन (पोस्ट मॉर्टेम) करू देणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. 
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह अनेक राजकीय नेते घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे सांत्वन केले. 

सोलापूर-नगर महामार्गावर अडीच तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन्ही बाजूंनी तब्बल पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लांगल्या होत्या. त्यानंतर करमाळा तालुका वकील संघ, पालकमंत्री देशमुख, जि.प.अध्यक्ष संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप आणि वीटमधील पाच शेतकरी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांशी रात्री दीड वाजता चर्चा झाली. तातडीची मदत देण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी करमाळ्यात येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. मात्र, ते नाशिकमध्ये शेतकरी समन्वय समितीच्या बैठकीत व्यग्र होते. 

Web Title: solapur news farmers suicide karmala CM devendra Fadnavis assurance post mortem