"नटसम्राट'चे एकपात्री प्रयोग विक्रमाच्या दिशेने 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

जागतिक ऑलिंपिक नाट्यसंमेलन दिल्लीत येत्या फेब्रुवारी महिन्यात होत आहे. जगातील 25 देशांचे कलावंत त्यात सहभागी होत आहेत. त्या संमेलनात सहभागी होण्याची संधी मला मिळावी, अशी माझी इच्छा आहे. 
- फुलचंद नागटिळक, खैराव 

सोलापूर - सोलापूर परिसरातील विविध महाविद्यालयांत नटसम्राट नाटकाचे एकपात्री प्रयोग फुलचंद नागटिळक करीत आहेत. नुकताच त्यांनी 4567 वा प्रयोग दयानंद महाविद्यालयात केला. हे प्रयोग विक्रमाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

दयानंद महाविद्यालयात प्राचार्य विजयकुमार उबाळे यांच्या उपस्थितीत नुकताच एकपात्री प्रयोग झाला. मराठी विभागप्रमुख डॉ. राजशेखर शिंदे या वेळी उपस्थित होते. याशिवाय शिवाजी नाईट कॉलेज, वसुंधरा महाविद्यालय, वालचंद महाविद्यालय या सोलापुरातील तर विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ, माऊली महाविद्यालय वडाळा या ठिकाणी श्री. नागटिळक यांनी हे प्रयोग सादर केले. सोलापूर विद्यापीठाच्या बीए भाग एकच्या मराठी ऐच्छिक विषयाच्या अभ्यासासाठी नटसम्राट हे नाटक आहे. हा एकपात्री प्रयोग पाहिल्यावर विद्यार्थ्यांना अभ्यास समजण्यास मदत होत आहे. 

माढा तालुक्‍यातील खैराव हे नागटिळक यांचे गाव आहे. कोणताही वारसा नसतानाही त्यांनी शेती करत ही कला जोपासली आहे. नटसम्राट हे कुसुमाग्रज यांनी लिहिलेले एक महत्त्वाचे नाटक आहे. त्यावर आलेला चित्रपट गाजला आहे. श्री. नागटिळक या नाटकातील अप्पासाहेबांबरोबरच त्यांची पत्नी, मुलगी, सून, नात, नोकर अशा सहा व्यक्तिरेखा साकारतात. या प्रयोगांना सुरवात कशी झाली, यावर नागटिळक सांगतात, की परभणीत झालेल्या नाट्यसंमेलनाच्या वेळी मी 17 वर्षांचा होतो. तिथे लक्ष्मण देशपांडे यांनी सादर केलेला नटसम्राटचा द्विपात्री प्रयोग पाहिला. त्यानंतर आपण एकपात्री प्रयोग करायचा हा ध्यास घेतला. त्यानुसार प्रयोग करू लागलो. आत्तापर्यंत कर्नाटक, गोवा, अंदमान, निकोबार येथे मराठी भाषकांसमोर त्यांनी प्रयोग केले आहेत. 

नागटिळक यांना कवितेची आवड आहे. त्यांचा मायभूमी हा कवितासंग्रह व मला भेटलेली माणसं आणि पंढरीच्या वाटेवर हे दोन लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ते माढा तालुक्‍यातील खैराव येथे ग्रामीण साहित्य संमेलन भरवितात. आतापर्यंत 14 संमेलने झाली आहेत. संत गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोचावा, यासाठी गाडगेबाबांची वेशभूषा करून ते पंढरीच्या वारीतही सहभागी होतात. त्यासाठी त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

Web Title: solapur news Fulchand Nagtilak