अक्कलकोट: देखाव्यांतून मंडळांनी दाखविला पोलिस ठाण्याचा कायापालट

राजशेखर चौधरी
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

अक्कलकोट शहरातील नागरीकांचे आर्थिक व मानसिक पाठबळ व कामासाठी सतत मिळालेली लोकसहभागाची प्रेरणा तसेच ग्रामीण पोलिस अधीक्षक विरेश प्रभू व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकरांचे मार्गदर्शन यामुळे शक्य झाले आहे. अक्कलकोच्या नागरिकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.
- सुरज बंडगर, पोलीस निरीक्षक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या लोकसहभागातून केलेल्या आमूलाग्र बदलांवर आधारित सहा मंडळाचे देखावे

अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील गणेश मंडळाचा उत्सव काळात विशेष असे देखावे नसतात. पण विसर्जनादिवशी देखाव्यासह निघणारी मॅरेथॉन मिरवणूक मात्र महाराष्ट्रात प्रसिद्ध अशी आहे. यावर्षीचे देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी एका वर्षात लोकसहभागातून शहर आणि पोलीस ठाण्यात केलेले आमूलाग्र बदलावर आधारित होते.

एकूण सहा मंडळांनी या कामावर आणि सुधारणेवर प्रभावित होऊन पोलिस ठाणे वर आधारित देखावा सादर करून या चळवळीला एकप्रकारे पाठबळच दिले आहे. वास्तविक पाहता पोलिस ठाण्याची पायरी चढण्याचे धाडस कोणीही सहसा करीत नाही. पण सुमारे एक वर्षपूर्वी पदभार घेतलेले सुरज बंडगर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहरात बसविलेले ४४ सीसीटीव्ही कॅमेरे व शहरातील सहा चौकात बसविलेले उद्घोषणेसाठी ध्वनिक्षेपक यंत्रे, शहरात केलेले एकेरी मार्ग व वाहन तळाची व्यवस्था, आणि पोलिस ठाण्यात केलेले आकर्षक बगीचा, रंगसंगती, पिण्याचे फिल्टर पाणी, बसण्यास बाकडे, सुंदर वृक्षवल्ली, पेव्हर ब्लॉक बसविणे, ठाण्यातील अंतर्गत बदललेली आहे.

या बाबी पाहिल्यावर शहर व तालुकावासिय आपल्या मुलांसह ठाणे बघायला येत आहेत. या त्यांच्या कामावर प्रभावित होऊन जय जवान गल्ली गणेश तरुण मंडळ, सोन्या मारूती गणेशोत्सव मंडळ, संयुक्त आझाद गणेशोत्सव मंडळ यासह सहा मंडळांनी यावर आधारित देखावे सादर करून आपापल्या क्षेत्रात सुधारणा घडविण्यासाठी यातून इतरांना प्रबोधन व आवाहन केले आहे.

अक्कलकोट शहरातील नागरीकांचे आर्थिक व मानसिक पाठबळ व कामासाठी सतत मिळालेली लोकसहभागाची प्रेरणा तसेच ग्रामीण पोलिस अधीक्षक विरेश प्रभू व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकरांचे मार्गदर्शन यामुळे शक्य झाले आहे. अक्कलकोच्या नागरिकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे.
- सुरज बंडगर, पोलीस निरीक्षक अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे

Web Title: Solapur news Ganesh mandal in akkalkot