द्राक्ष बागांवर डावणी रोगांचा प्रादुर्भाव

अक्षय गुंड
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

लाखो रुपये खर्च करून तोंडाशी आलेले द्राक्षेचे पीकावर नैसर्गिक बदलामुळे पडलेल्या डावणी रोगामुळे घड जळून नष्ट होऊ लागलेले आहेत. त्यामुळे शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी, हि अपेक्षा आहे.
- संताजी पाटील, द्राक्ष बागयतदार, रोपळे खुर्द

रोपळे खुर्दची परिस्थिती; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : माढा तालुक्‍यात यंदा पावसाने भरपूर प्रमाणात धुमाकुळ घातल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कधी न पडणारा पाऊस यंदा दिवाळीपर्यंत जोरदार पडला. यामुळे बहुतांश द्राक्ष बागावर डवणी या रोगांचा प्रादुर्भाव होवून शेतकरी वर्गांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे.

रोपळे खुर्द (ता. माढा) येथील माजी सरपंच संताजी पाटील यांनी 2011 साली द्राक्ष बागेची लागवड केली होती. पंरतु, सततच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी द्राक्ष बागेतून भरघोस उत्पन्न घेता येत नव्हते. यंदा पाऊस चांगला झाल्याने पावनेदोन लाख रूपयापर्यंत खर्च करून बाग चांगली तयार करण्यात आली होती. फळ चांगले येत असताना, ऑक्‍टोबर महिन्यात पडलेल्या पावासमुळे रात्रभर बागा भिजत राहिल्याने व वातावरणात बदल झाल्याने अचानक या महिन्यात द्राक्ष बागेवर डवणी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. संताजी पाटील यांच्यासह या भागातील शेतकर्यांचे द्राक्ष बागांमध्ये तयार झालेले घड नष्ट होवू लागले आहेत. या रोगाने 70 टक्के बाग जळून गेली आहे. हा रोग आटोक्‍यात येण्यासाठी सुमारे महिनाभर दरोरज फवारणी करण्यासाठी हजारो रूपये खर्च झाले आहेत. तरीही डवणी हा रोग आटोक्‍यात येत नसून याचा प्रादूर्भाव वाढतच चालला आहे.

शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेसाठी लाखो रुपये खर्च करून काढणीसाठी आलेले फळ नैसर्गिक बदलामुळे जळून चाललेल्या द्राक्ष पिकासाठी शासनाने विशेष तजवीज करून जे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत आहे. त्याकरीता शासनाने पंचनामे करून भरपाई देण्यासाठी भरीव तरतूद करावी, अशी मागणी द्राक्ष बागयतदार शेतकरी वर्गांतून होत आहे.

Web Title: solapur news grapes disease rain and farmer issue