दिव्यांगाच्या जीवनात शिक्षणाची बहार! 

विजयकुमार सोनवणे 
रविवार, 9 जुलै 2017

समावेशित योजनेमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या दिव्यांग बालकांना शिक्षणाची सोय झाली आहे. शिवाय ते मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
- सचिन जाधवर, समावेशित शिक्षण तज्ज्ञ

सोलापूर - शहरातील सुमारे 20 दिव्यांग बालकांच्या जीवनात शिक्षणाची बहार आली आहे आणि त्यासाठी निमित्त ठरली आहे सर्व शिक्षण अभियानांतर्गत असलेली समावेशित उपक्रम योजना. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 अन्वये सहा ते 18 वयोगटातील विशेष गरजा असणाऱ्या बालकांना सुयोग्य व संचारमुक्त वातावरणात नियमित विद्यार्थ्यांसमवेत शिक्षण देऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. त्यांचे पूर्ण प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. 
महापालिका क्षेत्रात एप्रिल ते मे 2017 या कालावधीत विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण झाले. विशेष गरजा असणाऱ्या सुमारे 20 शाळाबाह्य बालकांना शहरातील विविध शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला. पालकांच्या अतिकाळजी आणि दिव्यांगाच्या तीव्रतेमुळे घरीच बसून असलेली बालके ही कारणे या विद्यार्थ्यांसाठीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. घरातील धडधाकट भावंडे ज्या शाळेत जातात, त्याच शाळेत याही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. त्यामुळे या मुलांच्या जीवनात शिक्षणाची बहार आली आहे. सध्या सिद्धार्थ मराठी विद्यालय, राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा, राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय, श्री बसवेश्‍वर व रा. ना. माणेकरी या शाळेत हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

या विद्यार्थ्यांचा समावेश 
मतिमंद, स्वमग्न, वाचादोष, कर्णबधिर, बहुविकलांग, अस्थिव्यंग, मेंदुचा पक्षाघात, अध्ययन अक्षम, दृष्टिहीन आणि अल्पदृष्टी. 

समावेशित योजनेमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या दिव्यांग बालकांना शिक्षणाची सोय झाली आहे. शिवाय ते मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
- सचिन जाधवर, समावेशित शिक्षण तज्ज्ञ

Web Title: solapur news handicapped people social