महापालिकेच्या शाळांत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 24 मे 2018

सोलापूर - महापालिकेच्या पाच शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. सर्व शिक्षण अभियानांतर्गत हे विज्ञान केंद्र असतील. पहिलीपासून प्रात्यक्षिकासह शास्त्र शिकण्याची संधी या केंद्रामुळे उपलब्ध होणार आहे. 

सोलापूर - महापालिकेच्या पाच शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. सर्व शिक्षण अभियानांतर्गत हे विज्ञान केंद्र असतील. पहिलीपासून प्रात्यक्षिकासह शास्त्र शिकण्याची संधी या केंद्रामुळे उपलब्ध होणार आहे. 

महापालिकेच्या शाळांमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचे विज्ञान केंद्र उभारण्यात येत आहे. सध्या बहुतांश शाळांमध्ये पाचवीनंतर प्रात्यक्षिकांसह विज्ञान शिकवले जाते. मात्र, या केंद्रामुळे पहिलीपासून प्रात्यक्षिक करायला मिळणार आहेत. गरीब व ज्यांना आर्थिकदृष्ट्या अशा केंद्रांना भेटी देणे शक्‍य होणार नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी ही केंद्रे म्हणजे सुवर्णसंधी असणार आहे. 

अंदाजे 15 लाख रुपये किंमत असलेल्या या केंद्रामध्ये वैविध्यपूर्ण वस्तूंचा संग्रह आहे. तब्बल 520 प्रकारची खेळणी, साहित्य, विज्ञान प्रयोगासाठी आवश्‍यक साधनांचा समावेश आहे. विद्युत घंटी, विद्युत चक्रव्यूह, मानवी बॅटरी, दोरीवर चढणारे माकड, संवेक्ष अक्षय्यता, तोल सांभाळणारी बाहुली, खिळ्यांचा पलंग, विलक्षण चेंडू, जादूचा पाण्याचा नळ, संयुक्त दृष्टी, जेवणाचे आगळेवेगळे टेबल, दिवस व रात्र, कृत्रिम उपग्रह, सौर सेल, पवनचक्की, पाण्याचा भोवरा, डीएनएन मॉडेल, मानवी धडाचे मॉडेल, कागदाची भिंगरी, संगीत वाद्ये, मानवी हृदयाचे मॉडेल यासह अनेक वेगवेगळ्या आणि मुलांना आनंद देणाऱ्या कलाकृती या केंद्रात असणार आहेत. 

महापालिकेच्या पाच शाळांच्या परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांनाही या केंद्राचा लाभ घेता येईल. हसत-खेळत प्रात्यक्षिकांसह विज्ञान शिक्षण असे त्याचे स्वरूप आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला निश्‍चित चालना मिळेल. 
- सुधा साळुंके, प्रशासनाधिकारी

Web Title: solapur news Innovation Science Center in Municipal Schools