कर्मचाऱ्यांसाठीही आता मोबाईल ऍप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

सोलापूर - माहिती तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करत कर्मचाऱ्यांना स्मार्ट बनविण्याचा महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांचा प्रयत्न आता प्रत्यक्षात उतरला आहे. यातूनच महावितरणने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी "एम्प्लॉइज मित्र' हे मोबाईल ऍप आणि डॅशबोर्ड ही माहितीची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाज सुलभ होऊन ग्राहकांना प्रभावी सेवा मिळणे अपेक्षित आहे.

मोबाईल ऍपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सर्व वैयक्तिक सुविधा तर बहुतांश कार्यालयीन कामकाज हाताच्या बोटावर उपलब्ध झाले आहे. दर महिन्याचे पगारपत्रक, भविष्य निर्वाह निधीची माहिती, विविध भत्त्यासाठी (टीए, डीए) अर्ज व मंजुरी, रजेचा अर्ज व ऑनलाइन मंजुरी, शिस्तभंग कारवाई प्रलंबित असल्यास तिची स्थिती, सेवाज्येष्ठता यादी, बदलीसाठीचा विनंती अर्ज अशा सर्व वैयक्तिक सुविधा मोबाईल ऍपमधून मिळणार आहेत; तर या ऍपमधून केलेल्या अर्जावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही विहित मुदतीत ऑनलाइन कार्यवाही करावी लागणार आहे. या वैयक्तिक सुविधांशिवाय दैनंदिन कामकाजाबाबतच्या वरिष्ठांच्या सूचना किंवा निर्देशही ऍपवरून मिळण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

डॅशबोर्ड ही कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी दुसरी सुविधा असून, यात विविध माहिती ऑनलाइन व एकत्रितपणे उपलब्ध होणार आहे. ग्राहकांची आकडेवारी व यादी, त्यांच्या तक्रारी, दिलेले वीजबिल, ग्राहकांनी केलेला भरणा, जमा झालेली रक्कम, थकबाकी या सर्वांची माहिती व या माहितीचे विश्‍लेषण महावितरणच्या सर्वच कार्यालयांमध्ये ऑनलाइन उपलब्ध असेल. डॅशबोर्ड या प्रणालीमुळे महावितरणची सर्व माहिती अचूक व एकसमान मिळणार आहे. या माहिती व विश्‍लेषणाचा उपयोग करून आपापल्या कार्यक्षेत्रातील वितरण, वाणिज्यिक हानी, थकबाकी यासह विविध त्रुटींवर अधिक लक्ष केंद्रित करून परिणामकारक काम शक्‍य होणार आहे. आतापर्यंत 25 लाख 28 हजार वीज ग्राहकांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे.

Web Title: solapur news mahavitaran mobile app